बीड : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप बन्सोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अचानकपणे त्यांनी कोणत्या कारणावरून राजीनामा दिला हे अद्याप समोर आले नाही; परंतु महसूल कर्मचाऱ्यांमध्ये बन्सोड यांच्या राजीनाम्यावरून विविध चर्चांना उधाण आले आहे.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप बन्सोड हे एप्रिल २०२२ मध्ये रुजू झाले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांच्याबद्दल कोणाचीच तक्रार नव्हती. जवळपास अडीच वर्षे सेवा केल्यानंतर त्यांनी गुरुवारी जिल्हा प्रशासनास आपला राजीनामा दिल्याचे समजते. बन्सोड यांनी आपल्या राजीनाम्यात कार्यमुक्त होण्याचे कारण स्पष्ट केले नाही. या संदर्भात जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा राजीनामा अद्याप माझ्यापर्यंत आला नसल्याचे त्यांनी सांगितले. निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी म्हणाले की, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप बन्सोड यांचा राजीनामा प्राप्त झाला नसून, दोन दिवसांपूर्वी ते माझ्याकडे रजा अर्ज घेऊन आले होते.
बनसोड यांनी दिला दुजोरा
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप बन्सोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले; परंतु कोणत्या कारणावरून राजीनामा हे त्यांनी सांगितले नाही.