मोहोपाडा : राज्यातील आदिवासी वाड्यांवरील स्मशानभूमींचा प्रश्न वर्षांनुवर्षे कायम असतानाच वेगवान नदीप्रवाहातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ आल्याची विदारक घटना खालापूर तालुक्यात बुधवारी घडली.
या घटनेचे आता तीव्र पडसाद उमटत आहेत.
खालापूरमधील २३७ उंबऱ्याच्या आरकसवाडीतील कमळ चौधरी (वय ५८) यांचे मंगळवारी संध्याकाळी निधन झाले. या वाडीसाठीची स्मशानभूमी पिरकटवाडी नदीच्या पलीकडे आहे. मात्र, जोरदार पावसामुळे रात्रीपासूनच या नदीचा प्रवाह वाढला होता. त्यामुळे ग्रामस्थांसमोर अंत्यविधी कसा करणार, असा प्रश्न उभा ठाकला. त्यामुळे त्यांनी दुसरा दिवस उजाडण्याची प्रतीक्षा केली. त्यानंतर नदीच्या प्रवाहाचा वेग कमी होत नसल्याने अखेर या धोकादायक प्रवाहातून कमळ चौधरी यांची अंत्ययात्रा काढली.
व्हिडिओ व्हायरल
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आरकसवाडी – पिरकडवाडी आदिवासी वाड्यांना जोडण्यासाठी नदीवर पूल नाही. त्यामुळे दोन्ही वाड्यांतील ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून यामधून प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांना शाळेतही अशाच प्रकारे जीव धोक्यात घालून जावे लागते, असे ग्रामस्थ रवींद्र चौधरी यांनी सांगितले. या स्थितीचे कुणालाही सोयरसुतक नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
पुलाचे भूमिपूजन, वीटही रचली नाही
उंबरणेवाडी, पिरकडवाडी आणि आरकसवाडी येथील आदिवासी समाजाने अनेक वर्षांपासून पिरकडवाडी नदीवर पूल बांधण्याची वारंवार मागणी केली आहे. मात्र, या पुलाच्या कामाचे पाच महिन्यांपूर्वी केवळ नावापुरते भूमिपूजन करण्यात आले. आतापर्यंत येथे एक दगडही ठेवलेला नाही. शाळाही नदीपलीकडे पिरकटवाडीत असल्यामुळे लहानग्यांना याच नदीच्या प्रवाहातून जीव मुठीत घेऊन जावे लागते. आजारी रुग्णासही नदीतूनच न्यावे लागते. पावसाळ्यात नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानंतर उपचारासाठी येत नसल्याने काहींना जीवही गमवावा लागला आहे.
आरकसवाडी आदिवासीवाडीत व्यक्ती आजारी पडल्यास तिला नदी ओलांडून पाण्यातून पलीकडे न्यावे लागते. पावसाळ्यात नदीची पाणीपातळी वाढत असल्याने रुग्णालयात नेण्यास उशीर होत असल्याने काहींना जीव गमवावा लागला आहे. – संदीप निरगुडा, पिरकटवाडी ग्रामस्थ