मुंबई: राजकारणात कोणीही कोणाला संपवण्याची भाषा करू नये. आव्हानाची भाषा करण्यासाठी मनगटात जोर असावा लागतो, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
गोंधळलेल्या मन:स्थितीत असल्याने ते अशा प्रकारचे वक्तव्य करीत आहेत, असेही शिंदे म्हणाले.
‘एक तर तू तरी राहशील; नाहीतर, मी तरी राहीन!’ असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी दिले होते. त्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी प्रत्युत्तर दिले.
शिंदे म्हणाले, की राजकारणात चॅलेंज द्यायचे असेल तर घरात बसून काम होत नसते. घरात बसून फेसबुक लाइव्ह करून राजकारणात कोणीही टिकत नसते. त्यामुळे त्यासाठी त्यांना आधी घराबाहेर पडावे लागेल. त्यासाठी मनगटात जोर लागतो. मागच्या दोन वर्षांत आम्ही त्यांनी केलेला आरोपांच्या मागे न जाता काम करून त्यांच्या आरोपांना उत्तर देत आहोत. त्यामुळेच ते भीतीच्या छायेखाली असून, असे वक्तव्य करीत आहेत.