छत्रपती संभाजीनगर : महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी म्हणजेच नशीबच लागते. नोकर भरतीत हजारो विद्यार्थी परीक्षा देतात. यश मोजक्याच उमेदवारांना मिळते. अनुकंपा तत्त्वावर ५० उमेदवार मागील काही दिवसांपासून प्रशासनाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत.
त्यातच खंडपीठ, शासन आदेशानुसार लाड-पागे समितीच्या १२५ उमेदवारांना लवकरच नियुक्ती देण्यात येणार आहे. वर्ग-३ आणि ४ मध्ये ही नियुक्ती राहणार असल्याची माहिती मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.
लाड-पागे, अनुकंपाच्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली असून, पात्र उमेदवारांची निवड यादी अंतिम केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत आहेत. कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात कंत्राटी, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. महापालिकेत नोकर भरतीसाठी राज्य शासनाने परवानगी दिली असून, पहिल्या टप्प्यात अभियंत्यासह विविध विभागात ८७ कर्मचाऱ्यांची भरती अलीकडेच करण्यात आली. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, २८७ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
ही भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी महापालिकेत वर्ग-३ आणि वर्ग-४ च्या रिक्त पदांवर अनुकंपा तत्त्वावर आणि लाड-पागे समितीनुसार वारसांना नियुक्ती दिली जाणार आहे. अनुकंपा तत्त्वावर वर्ग-३ पदासाठी ८ आणि वर्ग-४ पदांसाठी ४२ अशा एकूण ५० उमेदवारांना आणि लाड-पागे समितीनुसार १२ जुलै २०२४ या शासन निर्णयाप्रमाणे अनुजाती, नवबौद्ध यांच्यासह १२५ उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली असून, पात्र उमेदवारांची निवड यादी अंतिम करून नियुक्ती आदेश दिले जाणार असल्याचे प्रशासकांनी सांगितले.