परवानगी फक्त १७ झाडांची, प्रत्यक्षात तोंडली ४०० सागवान झाडे; कंपनीला २१ लाखांची नोटीस

Khozmaster
2 Min Read

त्रपती संभाजीनगर : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील एका डिस्टीलरी कंपनीने मनपाच्या उद्यान विभागाकडून सागवानाची १७ झाडे तोडण्याची परवानगी घेतली. प्रत्यक्षात कंपनीने तब्बल ४०० झाडे तोडून टाकली.

या धक्कादायक प्रकारानंतर मनपाच्या उद्यान विभागाने कंपनीला दंड स्वरूपात २१ लाख ९५ हजार रुपये भरावेत म्हणून नोटीस पाठविली. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनात एकच खळबळ उडाली आहे. रक्कम न भरल्यास मनपाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

मनपाचे मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले की, कंपनीचे व्यवस्थापक नितीन साबळे यांनी कॅम्पसमधील १७ झाडे तोडण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे अर्ज केला. वृक्ष प्राधिकरणाने १७ झाडे तोडण्याची परवानगी दिली. मात्र, कंपनीने सुमारे चारशे झाडे तोडली. मनपा कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. झाडे तोडण्याची परवानगी नसताना परस्पर अनधिकृतपणे वृक्षतोड केल्याबद्दल कंपनीला महाराष्ट्र नागरी झाडांचे संरक्षण व संवर्धन अधिनियम १९७५ च्या कलम २१ (१) अन्वये २१ लाख ९५ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. डिस्टीलरी कंपनीने अद्याप दंड भरला नसल्याचे त्यांनी सांगितले.

कंत्राटदाराला ८० हजार रुपये दंड
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाकडून पैठण ते छत्रपती संभाजीनगर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. प्रकल्पाच्या व्ही. पी. शेट्टी कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराने रस्त्याच्या कामात अडथळा नसलेल्या नक्षत्रवाडी-कांचनवाडी रोडवरील दोन झाडांची छाटणी केली. व्ही. पी. शेट्टी कन्स्ट्रक्शन कंपनीला ८० हजार रुपये दंडाची नोटीस बजावली होती. कंत्राटदाराने तातडीने ८० हजार रुपयांचा दंड भरला.

सेंट फ्रान्सिस शाळेला २५ हजार दंड
जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस शाळेने मनपाची परवानगी न घेता नीलगिरीची झाडे तोडली. तक्रार मिळताच मनपाकडून शहानिशा करण्यात आली. शाळेला २५ हजार रुपये दंडाची नोटीस दिली. त्यांनी तत्काळ दंडाची रक्कम भरली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *