पावसाच्या पाण्यात २ वर्षांचा आमाेद बुडाला, डाॅक्टरांनी सीपीआर दिला अन् तो वाचला!

Khozmaster
2 Min Read

पुणे: ताे दिवस २५ जुलै आणि वेळ सकाळी ११ वाजताची. बाहेर धुवाॅंधार पाऊस पडून गेला हाेता. आळंदी येथे राहणारा अमोद थोरवे हा दाेन वर्षाचा चिमुकला खेळण्यासाठी घराबाहेर गेला; पण बराच वेळ झाला तरी परत आला नाही.

घरच्यांनी शोधण्यास सुरुवात केली तेव्हा तो शेतात साचलेल्या पाण्यात बुडाल्याचे दिसून आले. हे पाहून पालकांच्या काळजाचा ठाेका चुकला. बेशुद्ध आमाेदला जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे त्याला सीपीआर (छातीवर दाब देउन हृदयाचे ठाेके पूर्ववत करणे) दिला व हृदयाचे कार्य सुरू झाले. त्यानंतर औंध हाॅस्पिटलमधील अंकुरा हाॅस्पिटलमध्ये त्याचे उपचार झाले आणि त्याचा जीव वाचला.

आमाेदला आळंदीहून बॅग ॲण्ड ट्यूब व्हेंटिलेशनवर अंकुरा हॉस्पिटलमधील आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले. त्यावेळी ताे पूर्णत: बेशुद्धावस्थेत हाेता. त्याच्या हृदयाची क्रियादेखील अतिशय कमकुवत हाेती आणि रक्तदाबही कमी झाला होता. त्याला कार्डियाक अरेस्टचा संकेत दिसू लागल्याने त्वरित उपचार सुरू केले. सलग ४ तासांच्या प्रयत्नांनंतर डॉक्टरांच्या संपूर्ण पथकाला त्याचा जीव वाचवण्यात यश मिळाले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान डाॅक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी यांच्या तब्बल ३० हून अधिक जणांच्या पथकाने चिमुरड्याचा जीव वाचविण्यासाठी याेगदान दिले.

यांनतर १८ तासांच्या आत त्याचा व्हेंटिलेटरही काढण्यात आला. त्याचा मेंदू किंवा इतर अवयव सुस्थितीत असल्याने ३६ तासांनंतर त्याला घरी सोडण्यात आले. अंकुरा हॉस्पिटलमधील ज्येष्ठ नवजात शिशु व बालरोगतज्ज्ञ डॉ. उमेश वैद्य, आपत्कालीन विभागातील डॉ. चिन्मय जोशी, बालरोगतज्ज्ञ डॉ. विश्रुत जोशी, नवजात शिशूतज्ज्ञ डॉ. निखिल झा या चमूने अमोदवर यशस्वी उपचार केले.

हृदयविकाराच्यावेळी सीपीआरविषयी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. जेव्हा हृदय कार्य करणे थांबवते, तेव्हा महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा थांबतो, ज्यामुळे मेंदूचे नुकसान होते किंवा काही मिनिटांतच मृत्यू ओढावतो. सीपीआर हा वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रक्ताभिसरण आणि ऑक्सिजन मिळण्यास मदत करतो. हृदयविकाराच्या स्थितीत, प्रत्येक सेकंद महत्त्वाचा ठरतो आणि सीपीआर प्रशिक्षण घेतल्याने एखादा अमूल्य जीव वाचविता येतो. – डॉ. चिन्मय जोशी, पेडियाट्रिक इन्सेस्टिव्हिस्ट, अंकुरा हाॅस्पिटल

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *