लोकसभा निवडणुकीत महायुतीत असलेल्या भाजपचा मोठा पराभव झाला आहे. महायुतीमध्ये मोठा भाऊ मानला जाणाऱ्या भाजपला केवळ नऊ जागा जिंकता आल्या. भाजपने त्यांच्या पराभवाचे सगळं खापर महाविकास आघाडीवर फोडलं.
महाराष्ट्रात यंदा आपली लढाई चौथ्या पक्षाशी म्हणजे फेक नरेटिव्ह सोबत होती. दुर्दैवाने आपण इफेक्टिव्ह उत्तर दिलं नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पराभवाचे कारण सांगून टाकलं होतं. त्यानंतर सातत्याने देवेंद्र फडणवीस यांनी फेक नरेटिव्हवरुन विरोधकांवर टीका केली होती. मात्र आता लोकसभेला महायुतीसोबत असणाऱ्या राज ठाकरे यांनी यासाठी भाजपलाच जबाबदार धरलं आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान देशभरात संविधान बदलावरुन जोरदार चर्चा सुरु झाली होती. विरोधकांनी भाजप नेत्यांच्या भाषणाच्या आधारे संविधान बदलणार असा प्रचार केला. याचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणात बसला. राज्यात भाजपच्या वाट्याल्या ९ जागा आल्या. २०१९ ला २३ खासदार जिंकवूण आणणारा पक्ष ९ जागांवर आला. संविधान बदलाच्या चर्चांमुळे उत्तर प्रदेशातही भाजपला फटका बसला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची कारणीमीमांसा करताना आपण विरोधकांच्या फेक नरेटिव्हमुळे हरल्याचे म्हटलं.
फेक नरेटिव्ह फॅक्टरीला सोशल मीडियावर आपण तेवढ्या ताकदीने उत्तर देऊ शकलो नाही. आपली लढाई फेक नरेटिव्हशी होती. ज्या ठिकाणी आपण कमी पडलो त्या ठिकाणी त्या ठिकाणी इंडिया आघाडीशी हरलो नाही, फेक नरेटिव्हमुळे कमी पडलो आहे. संविधान बदलणार या खोट्या प्रचारामुळे या गोष्टी घडल्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. मात्र सोलापुरमध्ये बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.
“संविधानाविषयी पहिल्यांदा कोण बोललं? पहिल्यांदा भाजपचा अयोध्येचा उमेदवार याबाबत बोलला. भाजपचा उमेदवार ४०० पार झाले की संविधान बदलणार हे बोलला. म्हणजे त्यांनी विरोधकांना नरेटिव्ह दिले. तोपर्यंत कुठे चर्चाही नव्हती या गोष्टीची. त्यानंतर भाजपचेच लोक याविषयी काही बोलले. तिथूनच हे सगळं सुरु झालं,” असं राज ठाकरे म्हणाले.