अमरावती : विधानसभेच्या निवडणूकीच्या आगोदर मराठा आणि ओबीसी असे दोन तट पडले आहेत. हे राजकीय भांडण निवडणूकीपर्यंत चालेल, असे मी यापूर्वी म्हणालो होतो. ओबीसी मराठ्यांना मतदान करणार नाही आणि मराठे ओबीसींना मतदान करणार नाहीत.
आपले आरक्षण जातेय ही जाणीव ओबीसींना झाली आहे. जर ओबीसी आरक्षण टिकवायचे असेल तर विधानसभेत शंभर ओबीसी आमदार पाठविण्याची तयारी आम्ही करत असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीत सोमवारी व्यक्त केले. तसेच दोन तट असले तरी हे आपले राजकीय भांडण असल्याची भूमिका असल्याचेही आंबेडकरांनी सांगितले.
ओबीसी जागर यात्रेच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर हे अमरावतीमध्ये आहेत, यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आंबेडकर म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांना कणा नाही, त्यांना कणा असता, तर ते झूकले नसते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची तुलना केली, तर एकनाथ शिंदे यांची कामगिरी सरस आहे. याचा सरळसरळ अर्थ असा आहे, की जी शिवसेनेची मते आहेत, ती एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिली आणि शिवसैनिक आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षालाच खरी शिवसेना मानत आहे. तर सध्या राज्यात जे मराठा, ओबीसी असे दोन तट पडले आहेत याला मनोज जरांगेंची जी ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी आहे, त्यामुळे दोन तट पडले आहेत. राजकीय भांडणाचे सामाजिक भांडणात रुपांतर करण्याचे अनेकांचे मनसुबे ओबीसी आरक्षणाच्या यात्रेतून उध्वस्त झाले असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या नंतर सरकार ओबीसींची जात निहाय जनगणना मान्य करून घेईल. तसेच जात जनगणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तो पर्यंत ओबीसी आरक्षणावर स्थगिती दिली जाईल. असा निर्णय घेतला जाईल, असे अनेक जण सांगत आहेत. त्यामुळे आम्ही किमान १०० ओबीसी आमदार निवडून आणू असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राज ठाकरे यांच्यावर ताडा कायद्याअंतर्गत कारवाई करा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात वाढत असलेल्या लोकसंख्येवर भाष्य केलं आहे. यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांना सरकारने मागे पुढे न बघता आतमध्ये टाकलं पाहिजे असे म्हणत खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्रातील माणूस हा देशाच्या वेगवेगळ्या राज्यात राहतो गुजरात मध्येही राहतो त्यांचे काय करायचे त्यामुळे राज ठाकरे यांचे वक्तव्य समाज दुभंगण्याचे वक्तव्य आहे. समाज दुभंगला की देश दुभंगतो. त्यामुळे यूएपीए आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी.