पुणे : सेवा ज्येष्ठतेनुसार नियुक्ती करणे अपेक्षित असताना शेकडो कर्मचाऱ्यांना डावलून कनिष्ठ लिपिकांची भुसार विभाग प्रमुख व वाहन प्रवेश विभाग पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे.
व्यापाऱ्यांकडून याबाबत वारंवार चौकशी करण्याची मागणी करूनही पणन संचालकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर पणन मंत्री अब्दुल सत्तार हेच याकडे लक्ष देणार असल्याचे पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराची धग राज्य शासनापर्यंत पोहोचली आहे. अखेर पणनमंत्रीच येत्या आठ दिवसांत याची चौकशी करून पुण्यात भेट देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भुसार बाजार प्रकरणाची चौकशी सुरू आहे तर संबंधितास भुसारप्रमुख पदावर कार्यरत कसे ठेवले, असा प्रश्न उपस्थित करीत चौकशी होईपर्यंत संबंधिताचे निलंबन करावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. भुसारप्रकरणी चौकशीचे आदेश पणन संचालकांकडून २७ जूनला दिले आहेत. मात्र आजअखेर चौकशी नाही. चौकशी आदेश इकडून तिकडे केला जात आहे. पणन संचालक विकास रसाळ यांनी या प्रकरणात सहसंचालक राजेंद्रकुमार दराडे यांना चौकशीचे आदेश दिले. त्यांनी डीडीआरकडे सोपवले. त्यानंतरही चौकशी कामात वेळकाढूपणा व चालढकलपणा होत आहे. त्यानंतर पुन्हा पणन संचालक यांनी सहसंचालकांकडे आदेश दिले. त्यानंतर आता ८ ऑगस्टला पुन्हा सहसंचालक राजेंद्रकुमार दराडे यांनी डीडीआरकडे चौकशी सोपवली आहे. आता तरी चौकशी होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात वाढत्या तक्रारी आणि व्यापाऱ्यांना दिला जाणारा नाहक त्रास याबाबत पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे निवेदन दिले असून त्यांनी याबाबत पुढील आठवड्यात पुण्यामध्ये मिटींग लावून याची गांभीर्यपूर्वक चौकशी करण्यात येईल असे सांगितले आहे. तसेच पणन संचालक यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तक्रार दिली आहे. भुसार बाजारातील कारभाराबाबत लवकरच चौकशी अहवाल सादर केला जाईल असे सांगितले आहे. – आमदार माधुरी मिसाळ
पुणे शहरातील व्यापाऱ्यांचे प्रश्न समस्या सोडवणारी पुना मर्चंट चेंबर शिखर संस्था आहे. अलीकडे गुलटेकडी भुसार बाजारातील व्यापाऱ्यांना अधिकारी नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारी पूना मर्चंट चेंबरकडे काही व्यापाऱ्यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात पणन संचालक यांच्याकडे भुसार अधिकारी विरोधात व व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबतचे लेखी तक्रार निवेदन पणन संचालक यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यावर पणन संचालकाने योग्य ती चौकशी करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. -रायकुमार नहार, अध्यक्ष, दि पूना मर्चंट चेंबर
पुण्यात मॉल संस्कृती वाढल्यामुळे भुसार बाजारावर परिणाम होत आहे.त्यात बाजार समिती अधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना होणारा त्रास एकीकडे मॉल संस्कृती तर दुसरीकडे अधिकाऱ्यांकडून त्रास यामुळे व्यापारी व्यवसायाला वैतागला आहे. यावर भुसार अधिकारी यांच्या विरोधात आम्ही लेखी तक्रार केली आहे. त्यास पदावर ठेवण्याचा बाजार समितीचा अट्टाहास कशासाठी, असा सामान्य व्यापाऱ्यांना प्रश्न पडत आहे. – प्रवीण चोरबेले, माजी अध्यक्ष, पूना मर्चंट चेंबर