पुणे: ‘मी विराेधी पक्षनेता असताना विलासराव देशमुख असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, तटकरे असतील एकमेकांवर सडेताेड टीका दीड-दीड तास करायचाे. पण, जेवणाच्या सुटीत विलासरावांची चिठ्ठी यायची, की जेवायला माझ्याकडे या किंवा तटकरे माझ्याकडे जेवायला यायचे.
आता असे चित्र दिसेल का? असा सवाल भाजपचे महासचिव विनोद तावडेंनी (Vinod Tawde) उपस्थित केला. हा आमचा महाराष्ट्र आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकमेकांवर काय टीका केल्या, हे आम्ही कार्यकर्ते असताना पाहिलेले आहे. पण, नंतर जणू काही झालेच नाही असेच दिसायचे, असेही तावडे म्हणाले. पानिपतकार विश्वास पाटील लिखित ‘अण्णा भाऊ दि अपहोल्डर दलित अँड विमेन लिटरेचर’ या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
पानिपतकार विश्वास पाटीललिखित अण्णा भाऊ साठे यांच्या चरित्रग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीच्या प्रकाशनाला शरद पवार, रावसाहेब कसबे येणार हे समजले. कसबे विशेष ‘झाेत’ टाकणारच, पण पवारसाहेब झाेत टाकणार, त्याचा परिणाम कुठे, हे शाेधण्यातच सगळ्यांचा वेळ जाताे. सध्या निवडणुकांचे दिवस आहेत, अशी राजकीय कोटी तावडे यांनी करताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला. खुद्द शरद पवार यांनीही मिश्कील हसून तावडे यांना दाद दिली.
‘अण्णा भाऊ दि अपहोल्डर दलित अँड विमेन लिटरेचर’ या इंग्रजी व हिंदी ग्रंथाचे प्रकाश बालगंधर्व रंगमंदिरात सोमवारी सकाळी पवार यांच्या हस्ते झाले. तावडे हेही पवार यांच्या शेजारी व्यासपीठावर होते. त्यावेळी त्यांच्यात काहीच संवाद झाला नाही, मात्र, ती कसर तावडे यांनी भाषण करताना भरून काढली. रावसाहेब कसबे यांच्या ‘झोत’ या पुस्तकाचा संदर्भ घेऊन त्यांनी पवारांचा ‘झोत’वर प्रकाश टाकलाच. त्याशिवाय, पंतप्रधान मोदी यांच्याकडे शरद पवार यांचे खूपच चालते, म्हणत त्यांनी पवार-मोदी संबंधही सूचित केले.
तावडे म्हणाले, ‘मला आठवतं, की मनाेहर जाेशींच्या पुस्तक प्रकाशनाला संसदेच्या हाॅलमध्ये एकदा शरद पवार आले होते. यूपीच्या खासदारांनी त्यांना विचारले, तुम्ही शिवसेनेच्या खासदारांच्या पुस्तक प्रकाशनाला कसे आले? आमच्याकडे असे केले, तर पक्षातूनच काढून टाकतील. महाराष्ट्रातील राजकारण हे असेच प्रगल्भ हाेते. ‘हाेते’ असं मी जाणीवपूर्वक म्हणेन, असा उल्लेख करत तावडे यांनी राज्यातील हल्लीच्या राजकारणातील तणावाकडेही लक्ष वेधले.