“नारायण राणेंची आक्रमक बोलण्याची पद्धत”, फडणवीस यांनी केला बचाव, संजय राऊत म्हणाले…

Khozmaster
2 Min Read

मालवणमधील राजकोट येथे असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे सध्या राज्यात संतापाचं वातावरण आहे. मात्र ज्या ठिकाणी हा पुतळा कोसळला, त्याच ठिकाणी काल शिवसेना ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला.

यावेळी भाजपा नेते आणि स्थानिक खासदार नारायण राणे हेही कमालीचे आक्रमक झालेले दिसले तसेच ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पोलीस आणि प्रसारमाध्यमांना दमदाटी करताना दिसले. नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यांवरून आता विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचा बचाव केला आहे. नारायण राणेंची आक्रमक बोलण्याची पद्धत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आज सकाळी देवेंद्र फडणवीस हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांना नारायण राणे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला असं वाटतं की, नारायण राणे यांची बोलण्याची एक पद्धत आहे. ते बोलताना नेहमी आक्रमक असतात. मात्र ते कुणाला धमक्या वगैरे देतील, असं मला वाटत नाही.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचा बचाव केल्यानंतर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, काय तर म्हणे त्यांची बोलण्याची स्टाईल आहे, म्हणत, गृहमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानांचं समर्थन करताहेत. आम्हीही बोलतो, मग आमच्यावर गुन्हे दाखल का करता. महाराष्ट्राची संस्कृती संस्कार हे देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये पूर्णपणे नष्ट झाले आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *