“सतत चुका करून माफी मागणारे दादा, आता चुकीला माफी नाही..”; शरद पवार गटाचा निशाणा

Khozmaster
2 Min Read

मुंबई – मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी विरोधकांकडून महायुती सरकारला टार्गेट केले जात आहे. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात रस्त्यावर आक्रोश करण्यात येतोय.

त्यातच महायुतीचे घटक असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या जाहीर सभेत या प्रकरणावरून महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची जाहीर माफी मागतो हे विधान केले. त्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अजित पवारांवर खोचक टोला लगावला आहे.

शरद पवार गटाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत अजित पवारांनी ९ ऑगस्ट आणि २४ ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणातील काही भाग आहे. त्याखाली स्वाभिमानी महाराष्ट्र म्हणतो, चुकीला माफी नाही अशा आशयाचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनला म्हटलंय की, सतत चुका करून दमदाटीच्या स्वरात ‘माफी’ मागणाऱ्यांना असं वाटतं असेल की, महाराष्ट्र गद्दारी विसरेल.तर हा तुमचा भ्रम आहे कारण स्वाभिमानी महाराष्ट्र सर्व काही स्वीकारतो पण गद्दारी आणि गुलामी स्वीकारत नाही असा घणाघात अजित पवारांवर करण्यात आला आहे.

व्हिडिओत अजित पवार काय म्हणाले होते?

९ ऑगस्टच्या सभेत अजित पवार म्हणाले की, आता लोकसभेला जो काही झटका दिलाय तो लईच लागलाय, पार कंबरडं मोडायची वेळ आली, पण आता माफ करा. चूक झाली असं म्हटलं तर २४ ऑगस्ट रोजी मालवण राजकोट किल्ल्यावरील घटनेवर बोलताना महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा वर्षाच्या आत पडणे दुर्दैवी आहे. मी याबद्दल महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो असं या व्हिडिओत अजित पवार बोलताना ऐकायला मिळते.दरम्यान, मालवण राजकोटच्या घटनेवरून आता सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही मूक आंदोलन सुरू केल्याचं दिसते. ठाणे, सोलापूर येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी आंदोलन केले. त्यावरून विरोधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तुम्ही आंदोलन कसली करता, राजीनामा द्या अशी मागणी करत अजित पवारांना टोला लगावला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *