ज्याची चर्चा होती तेच घडलं; काँग्रेस आमदारानं दिला राजीनामा, भाजपात प्रवेश करणार?

Khozmaster
2 Min Read

नांदेड – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या पक्षांतराला सुरुवात झाली आहे. एकीकडे भाजपामधील काही नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे काँग्रेसलाही अपेक्षित धक्का बसला आहे.

देगलूर विधानसभेचे काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण समर्थक मानले जातात. त्यामुळे लवकरच ते भाजपात प्रवेश करतील असं बोललं जातं.

विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा आरोप झाल्यानंतर जितेश अंतापूरकर हे चर्चेत आले होते. काँग्रेसची काही मते फुटली. त्याबाबत पक्षात काही जणांवर संशय व्यक्त करण्यात येत होता. ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले त्यांची नावे नेतृत्वाला दिली होती. त्यात अंतापूरकर यांच्यावरही संशय होता. क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांनावर थेट कारवाई करणं अशक्य असल्याने त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याचं ठरलं होते. त्यातच इतक्या दिवसांपासून अंतापूरकर भाजपात जातील अशी चर्चा होती ती जितेश अंतापूरकर यांच्या राजीनाम्यामुळे स्पष्ट झाली आहे. आज दुपारी जितेश अंतापूरकरांचा भाजपात प्रवेश होईल असं बोललं जाते.

कोण आहेत जितेश अंतापूरकर?

जितेश अंतापूरकर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, ते पदवीधर आहेत. हैदराबादच्या सेंट मेरी इंजिनिअरींग कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. जितेश अंतापूरकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.

दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होतील अशी चर्चा आहे. अद्याप निवडणूक आयोगाकडून तारखा घोषित झाल्या नाहीत परंतु २६ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. राज्यात गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित निवडणूक लढवून बहुमत मिळवलं होते. परंतु मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षात बिनसलं. त्यानंतर शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी झाली. राज्यात सर्वाधिक जागा मिळवलेला भाजपा १०५ आमदारांसह विरोधी बाकांवर बसले. त्यानंतर अडीच वर्षात मविआ सरकार कोसळले, शिवसेना-राष्ट्रवादीतही फूट पडली. त्यानंतर महायुती सरकार राज्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *