अकरावीच्या विशेष चौथ्या फेरीत ७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश; ३६ हजार विद्यार्थी प्रवेशाविनाच

Khozmaster
2 Min Read

मुंबई : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाच्या विशेष चौथ्या फेरीत गुरुवारी एकूण १४ हजार ४५४ विद्यार्थी पात्र ठरले, मात्र त्यातील सात हजार ७४१ विद्यार्थ्यांनाच या फेरीत महाविद्यालय मिळाले आहे.

या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चिती करण्यासाठी आज शुक्रवारी सायंकाळपर्यंत मुदत असणार आहे. त्यानंतर उद्या शनिवारी रिक्त जागांची यादी जाहीर होणार असून, पुढील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

वेबसाइटवरील माहितीप्रमाणे अद्यापही ३६ हजार ३५५ विद्यार्थी प्रवेशाविना वंचित असून, प्रवेशासाठी एक लाख ४५ हजार ८०९ जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत अकरावी ऑनलाइन प्रवेशात ८७ टक्के जागांवर प्रवेशाची निश्चिती झाली आहे.

अकरावी प्रवेशासाठी तीन सामान्य आणि तीन विशेष फेऱ्या झाल्यानंतर गुरुवारी चौथ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. मात्र, आतापर्यंत बहुतांश नामांकित महाविद्यालयांच्या जागा भरल्या आहेत. विद्यार्थी संकेतस्थळावर आपल्याला हव्या त्या महाविद्यालयांची कट ऑफ यादी पडताळू शकतात. चौथ्या फेरीत चार हजार ७७१ विद्यार्थ्यांना पहिला पसंतीचे महाविद्यालय, ५५३ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे, तर ३७८ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

३६ हजार विद्यार्थ्यांचे काय चुकतेय?

१) अनेक विद्यार्थ्यांचा अजूनही आवडीच्या महाविद्यालयात प्रवेशासाठीचा हट्ट कायम आहे. त्यामुळे महाविद्यालय मिळूनही अनेक विद्यार्थ्यांकडून त्याकडे पाठ फिरवली जात आहे.

२) मात्र विद्यार्थ्यांनी आता आवडीच्या महाविद्यालयाचा हट्ट न करता मिळेल त्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

३) अकरावीनंतर बारावीमध्ये महाविद्यालय बदलण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते, त्यावेळी ते हा बदल करू शकतात. मात्र, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतून विद्यार्थी बाहेर पडल्यास त्यांना प्रवेश घेणे कठीण होणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *