‘महाराजांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार’, अजितदादांनी राजकोट किल्ल्याला दिली भेट, नेत्यांनाही सुनावलं

Khozmaster
2 Min Read

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना समोर आली. या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकोट किल्ल्यावर भेट देत.

पुतळा कोसळला त्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी पवार यांनी नवीन पुतळा बसवण्यासाठी राज्य सरकारने गेल्या दोन दिवसांपासून बैठका घेतल्याची माहिती दिली. यावेळी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

“दोन दिवसापूर्वी घडलेल्या घटनेचं सर्वांनाच दु:ख आहे. याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. मी या खोलात जात नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. प्रत्येकाला महाराजांचा इतिहासाचा अभिमान आहे, अनेक ठिकाणी महाराजांचे पुतळे आहेत. अनेकजण या ठिकाणी नतमस्तक होतात. या ठिकाणी समाधानही मिळत असतं. आता या ठिकाणी महाराजांच्या नावाला साजेसा असा पुतळा या ठिकाणी होणार आहे, याबाबत राज्य सरकारने निर्णयही घेतला आहे. या ठिकाणी शेजारी असणारी जमीन घेण्याबाबत विचार सुरू आहे. ते खासगी व्यक्ती या कामासाठी द्यायला तयार आहे. बारकाईने लक्ष देऊन पुन्हा या ठिकाणी पुतळा उभारला जाणार आहे. दोन दिवसापासून राज्य सरकार यासाठी बैठका घेत आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, समुद्राकाठी अनेकठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत. यावेळी वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास केला जातो. हा पुतळा नटबोल्ट गंजल्यामुळे कोसळल्याचं बोललं जातंय. ज्यावेळी नेव्ही डे दिवशी या पुतळ्याचे उद्घाटन केलं होतं त्यावेळी मी स्वत: या ठिकाणी उपस्थित होतो. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे होते. अनावरण केले त्यावेळी सगळं व्यवस्थित दिसत होतं. आता या प्रकरणाची सर्व चौकशी केली जाणार आहे. सर्वांना ताब्यात घेतलं जाणार आहे.

‘वाद घालण्यात अर्थ नाही’

“पुतळा प्रकरणी मी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली. या प्रकरणात आता पुतळा नेव्हीने की PWD ने बांधला यावर वाद घालण्यात अर्थ नाही. पहिल्यांदा या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. पुन्हा या ठिकाणी भव्य पुतळा उभा राहिला पाहिजे, यासाठी सरकारने लक्ष घातले आहे, असंही अजित पवार म्हणाले.

‘ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये झालेल्या गोंधळावर बोलताना पवार म्हणाले, प्रत्येक राजकीय पक्षांनी तारतम्य ठेवलं पेहिजे, तिथल्या नेत्यांनी तारतम्य ठेवलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात काहीही करता कामा नये. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जी आहे. त्या प्रकारे आपण वागलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *