विविध मागण्यांसाठी ३ सप्टेंबरपासून पुकारलेल्या संपामुळे लालपरी थांबली, १७ कोटींचा फटका

Khozmaster
2 Min Read

अमरावती : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ३ सप्टेंबरपासून पुकारलेल्या संपाला जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला.

८ आगारांतील चालक-वाहकांनी या संपात भाग घेतल्याने एसटीच्या ८४३ पैकी ३६५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. परिणामी, एसटी महामंडळाने सुमारे १७ कोटी ७१ लाख २३३ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

संपामुळे एसटी चाके आगारातच थांबल्याचे दिसून आले. एसटी बंदचा प्रवाशांना मोठा फटका बसून मनस्ताप सहन करावा लागला. प्रवाशी, विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा पर्याय शोधावा लागला. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त रक्कम मोजावी लागली. मोफत प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक आणि अर्ध्या तिकिटात प्रवास करणाऱ्या महिलांनी याबाबत मात्र नाराजी व्यक्त केली आहे. सण उत्सवाच्या तोंडावर पुन्हा एकदा एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे.

प्रवासी, विद्यार्थी ताटकळत बसले
एसटी बसस्थानकावर बसने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसह शाळा महाविद्यालयात लालपरीने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस आता आता येईल, याची प्रतीक्षा करत तासन् तास ताटकळत बसावे लागले

“एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला असला तरी त्यांच्या मागण्या रास्त आहेत. भाजपजन सत्तेत नसतात तेव्हा विलिनीकरणाच्या बाता करतात. सत्तेत असताना विलिनीकरण होऊ शकत नाही, अशी दुटप्पी भूमिका घेतात.”
– आ. अॅड. यशोमती ठाकूर

“गावाला जाण्यासाठी सकाळपासून डेपोत बसची वाट पाहत उभा आहे. बस नसल्याने गावाला जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था नाही. एसटी कामगारांच्या संपावर तोडगा काढून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी.”
– विजय काळे, प्रवासी

“विभागातील ८४३ फेऱ्यांपैकी ३६५ फेऱ्या कामगारांच्या संपामुळे रद्द कराव्या लागल्या. २३१२ कर्मचाऱ्यांपैकी संपात ४२६ कामगार सहभागी होते. मोर्शी व बडनेरा आगारामधून बस सुरू होत्या. या संपामुळे १७ कोटींहून अधिक महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले.”
– नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *