राज्यातील महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांमध्ये सहाशे चांगले निर्णय घेतले. अनेक निर्णय मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेखाली दबून गेले, असे मिश्कीलपणे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना मैलाचा दगड ठरल्याची भावना व्यक्त केली. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या आणि पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना या योजनेतून मिळणाऱ्या दीड हजार रुपयांची किंमत काय कळणार,’ असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
आळंदी येथे फ्रुटवाले धर्मशाळेत आयोजित मारोती महाराज कुरेकर यांच्या ९३व्या आणि रामराव महाराज ढोक यांच्या ७० व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या यांच्या हस्ते कुरेकर यांना शांतीब्रह्म आणि ढोक यांना तुलसीदास पुरस्कार प्रदान करण्यात आला; तसेच संतपूजनही करण्यात आले. सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, खासदार श्रीरंग बारणे, ‘म्हाडा पुणे’चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव यांच्यासह विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान देवस्थान, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, मुक्ताई देवस्थान आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.