लग्नाचा तगादा लावत ब्लॅकमेल करत असल्याने ५७ वर्षीय हॉटेल मालकाने २५ वर्षीय तरुणीची हत्या केल्याच्या नागपुरातील घटनेत नवीन माहिती उघड झाली आहे. मयत तरुणी प्रिया बागडे हिने लंडनमधील एका ७० वर्षीय वृद्धाशी आभासी (ऑनलाईन) लग्न केले होते. या वृद्धासह ती अनेकांचा संपर्कात होती, अशी धक्कादायक माहिती मानकापूर पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
दरम्यान पोलिसांचे पथक बुधवारी प्रियाचा मारेकरी महेश केशवराव वडस्कर (वय ५७ वर्ष, रा. सक्करदरा) याला घेऊन रामटेक येथे गेले. रामटेकपासून सुमारे ३ किमी अंतरावर प्रियाला पुरल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी प्रियाचा मृतदेह बाहेर काढला. सध्या महेश हा पाच दिवस मानकापूर पोलिसांच्या कोठडीत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये प्रिया ही फेसबुकद्वारे लंडनमधील ७० वर्षीय वृद्ध जॉन ग्लक याच्या संपर्कात आली. दोघांनी ऑनलाइन लग्न केले. त्यानंतर तिने आपली फेसबुक प्रोफाइल बदलली. प्रिया ग्लक असे नाव दिले. लग्नानंतर जॉन हा प्रियाला दर महिन्याला २० हजार रुपये पाठवायचा