तामसवाडी येथील उपोषण आंदोलनात दिला इशारा
निपाणी निमगाव, तामसवाडी, वाटापुर या रस्त्याचे अपूर्ण राहिलेले काम त्वरित चालू करावे जे काम झाले ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने त्या कामाची चौकशी करून संबधित ठेकेदार व अभियांत्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी तामसवाडीसह वाटापुर येथील ग्रामस्थांनी हनुमान मंदीरात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, जवळ जवळ तीन कोटींचे खर्चाचे अंदाजपत्रक असणाऱ्या निपाणी निमगाव, तामसवाडी, वाटापुर या रत्याच्या कामास मागील आठ वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली. तसेच ठेकेदारावर दोन वर्षात हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. परंतु राजकिय पुढारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या मर्जीतल्या ठेकेदारास मिळालेले टेंडर, रस्ता कामाच्या निधीतून वाटलेली टक्केवारी या भ्रष्ट कारभारामुळे कामाची सुरूवातच निकृष्ट दर्जाने झाली. दोन वर्ष मुदतीच्या कामास चार ते पाच वेळा मुदत वाढवून देण्यात आली आज दहा वर्ष उलटूनही हे काम अपुर्णच आहे तर बांधकाम विभागाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. अर्धवट अवस्थेत असलेल्या या कामामुळे ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे व अपघात होवून अनेक ग्रामस्थ जखमीही झाले आहेत. अर्धवट कामामुळे तामसवाडी ग्रामस्थांना खरवंडी मार्गे फिरुन येण्याची वेळ आली आहे.पावसाच्या दिवसांमुळे तर रस्त्याची परिस्थिती अधिकच वाईट झालेली आहे. यामुळे तिन्ही गावातील संतप्त ग्रामस्थांनी तामसवाडी येथील हनुमान मंदीरात सारंगधर फोफसे व संजय कोलते यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत काम सुरु केले जात नाही व ठोस कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत आंदोलनं सुरू राहील अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. या आंदोलनात सहभागी संभाजी माळवदे यांनी जर तातडीने कामास प्रारंभ केला नाही तर नेवासा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा उपअभियंता रमेश दुबाळे यांना दिला. संतोष काळे यांनी या कामाची राज्य गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली.यावेळी आंदोलनात सुरेश शेटे पाटील यांनी पाठिंबा देत सहभाग घेतला. यावेळी संजय कोलते,सारंग फोफसे, बाबा फोपसे, रमेश कोलते, दत्ता कर्जुले, संजय काळे, महेश कर्जुले, आप्पा आयनार, शिवाजी जगताप, भाऊसाहेब जाधव, गोवर्धन आयनार, भास्कर मोटे, शंकर कर्जुले, पप्पू गोसावी, संजय गांधी, जालिंदर कर्जुले आदीसह ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. यावेळी उपअभियंता याना संपर्क साधला असता त्यांनी ठेकेदारावर खापर फोडत लवकरच कामास प्रारंभ केला जाईल असे आश्वासन दिले.
Users Today : 28