पहिल्या बॉयफ्रेंडला जेलमध्ये पाठवण्यासाठी अल्पवयीन मुलीने दुसऱ्या बॉयफ्रेंड सोबत सामूहिक बलात्काराची फिल्मी स्टाईल स्टोरी रचून पोलिसांची धावपळ केली आहे. ही घटना पुण्यातील बारामती मध्ये घडली आहे. या घटेबद्दल सत्य पुढे आल्यानंतर मात्र पोलिसांसह सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. सविस्तर बातमी अशी की, बारामती मधील एका सामाजिक कार्यकर्त्याला अल्पवयीन मुलीने फोन करून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा खोटा प्रकार सांगितल्याने एकच खळबळ उडाली होती. मुलगी अत्यंत हुबेहूब कथानक करत होती. अगदी ती फोनवर बोलत असताना रडत होती. त्यामुळे तिच्यासोबत असा काही प्रकार घडला असल्याच नाकारता येत नव्हतं. त्यामुळे बारामती पोलीस देखील कामाला लागले. वरिष्ठ पोलिसांनी देखील याची गंभीर दखल घेतली. अल्पवयीन मुलीला महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फत विश्वासात घेतलं. तिच्याकडे विचारपूस करण्यात आली. परंतु, अल्पवयीन मुलगी प्रत्येक वेळी- वेगवेगळी उत्तर देत होती. महिला अत्याचाराच्या या घटनेमुळे पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली होती
….फिल्मी स्टाईल कथानक समोर आलं.!
अल्पवयीन मुलगी मात्र सत्य सांगत नसल्याने पोलिसांच्या नाकी नऊ आले. तोपर्यंत हा सर्व प्रकार उपमुख्यमंत्र्यांच्या ओएसडी पर्यंत पोहोचला त्यांनी देखील संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशा सूचना दिल्या. त्यामुळे बारामती पोलीस आणखीनच दडपणाखाली आले. पोलीस वारंवार सांगूनही आणि विचारपूस करूनही अल्पवयीन मुलगी प्रश्नांची उत्तरे देत नव्हती.अल्पवयीन मुलगी ही पोलिसांची दिशाभूल करत असल्याचं पोलिसांना संशय आला. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर सर्व फिल्मी स्टाईल कथानक समोर आलं.पहिल्या बॉयफ्रेंडला जेलमध्ये पाठवण्यासाठी दुसऱ्या बॉयफ्रेंड सोबत सामूहिक बलात्काराचा बनाव रचल्याच मुलीनं अखेर पोलिसांना सांगितलं. ही सर्व घटना फिल्मी स्टाईल असल्याने काहीसा संशय पोलिसांना आधीच आला होता. सर्व बनाव मालिका पाहून केल्याचं अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितलं आहे.
Users Today : 9