गेल्या १० दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण भक्तिमय करून टाकणाऱ्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस असून लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी जय्यत तयारी केली आहे. मुंबई-पुण्यासह राज्यभरात बाप्पांच्या मिरवणुकीसाठी ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. पोलीस यंत्रणा यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सज्ज आहे. त्याव्यतिरिक्त मिरवणूक जाणाऱ्या मार्गांवरील वाहतूकही तात्पुरती इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे.
पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीला दिमाखदार प्रारंभ झाला. प्रथेनुसार महात्या फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुप्षहार अर्पण करून ठीक साडेदहा वाजता विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. पालकमंत्री अजित पवार , केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार रवींद्र धंगेकर, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. ढोल-ताशांचा निनाद, बँडपथकातील कलाकारांनी वाजविलेल्या सुरेल सुरावटी, शंखनिनाद अशा पारंपरिक मराठमोळ्या वातावरणात मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रस्तावर आली. चौका- चौकात रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची सजावटीसह रस्त्याच्या दुतर्फा गणेशभक्तांनी गर्दी केली होती.
अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जनासाठी सकाळी ११ वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये ४७०८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे जलसंपदा विभागाने काल (१६ सप्टेंबर) गणेश विसर्जनासाठी पाणी सोडण्याचे नियोजन नसल्याचे स्पष्ट केले होते. सविस्तर वाचा
ठाणे : ढोला-ताशा, बँजो, ध्वनिवर्धकांवरील दणदणाटी गाण्यांवरील गणेश विसर्जन मिरवणुका टाळून गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्याचा निर्णय ठाण्यातील काही सार्वजनिक मंडळांनी घेतला आहे. गुलालाऐवजी फुलांची उधळण, पारंपरिक वेशभूषा आणि टाळांच्या गजरात मिरवणुका काढल्या जातील.
ठाणे : अनंत चतुर्दशी निमित्ताने ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि भिवंडी शहरात शहरात वाहतुक बदल लागू केले आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गांवर कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.ठाणे शहरातील साकेत, कळवा, विटावा येथून सिडको किंवा स्थानक परिसराच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना कळवा खाडी पुल तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रवेश बंदी असेल.
मुंबईतील तेजुकाया गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून ही मिरवणूक गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे.
मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणपती विसर्जन मिरवणुकीला सकाळी११ वाजता सुरुवात होणार असून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीची तयारी सुरू केली आहे.
Users Today : 17