पुण्यात पुन्हा हिट अँड रन; जखमी प्रेमची मृत्यूशी झुंज अपयशी, आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर

Khozmaster
2 Min Read

पुणे: पुण्यात हिट अँड रनच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यात काही दिवसांपूर्वी मुळशी तालुक्यात शाळकरी मुलांना उडवल्याची घटना घडली होती. त्यात १४ वर्षीय मुलगा प्रेम साहेबराव चव्हाण याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने चव्हाण कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई-वडिलांच्या पोटचा एकुलता एक गोळा गेल्याने संपूर्ण मुळशी तालुक्यातुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

चार मित्रांना कारने उडवलं

मुळशी तालुक्यात असणाऱ्या शेरे गावात मामासाहेब मोहोळ विद्यालयामध्ये प्रेम शिक्षण घेत होता. दोन दिवसांपूर्वी प्रेम आणि त्याचे चार मित्र घरी जात असताना एका चार चाकी चालकाने या सर्वांना धडक दिली. यामध्ये प्रेम गंभीरित्या जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य पाहता तातडीने कारवाई करत कारचालकाला ताब्यात घेतले होते. तर प्रेमवर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, अखेर प्रेमची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्याचा मृत्यू झाला.चव्हाण कुटुंबीयांची घरची परिस्थिती बेताची असल्याने प्रेमवर उपचारासाठी त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याचे वडील गाडी चालक आहेत. या चव्हाण कुटुंबीयांना मदत करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेत लाखो रुपये गोळा केले. प्रेमच्या उपचारासाठी त्यांनी चव्हाण कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. मात्र, प्रेमचा जीव वाचवण्यात यश आले नाही.

एकुलता एक मुलगा गमावला, आई-वडिलांचा आधार गेला

प्रेम हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. म्हातारपणीचा आधारच गेल्याने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रेमला आणखीन एक लहान बहीण आहे.प्रेम स्वभावाने मनमिळावू होता. राहणाऱ्या परिसरामध्ये आणि शाळेमध्ये तो सर्वांशी प्रेमाने बोलत असत. त्याच्या अशा अकाली मृत्यूने त्याचा मित्र परिवारावर देखील शोककळा पसरली आहे. त्याच्या मृत्यूमुळे अनेकांचे मन हेलावले आहे. कोणावरही अशी वेळ येऊ नये, अशा भावना यावेळी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या.

0 6 2 3 5 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *