उज्ज्वल केसकर विधानसभेच्या रिंगणात? चंद्रकांत पाटील यांच्यापुढील अडचणी वाढण्याची चिन्हे

Khozmaster
2 Min Read

पुणे : ‘संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून पैसा या तत्वाच्या विरोधात असणाऱ्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा कार्यकर्ता म्हणून जनतेच्या दरबारात जाण्याचा विचार करीत असून, भारतीय जनता पक्षाकडे कोथरूड किंवा शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी मागितली आहे,’ अशी माहिती महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी दिली. केसकर यांनी कोथरूडमधून यापूर्वीही बंडाचे निशाण फडकवले होते. आता पुन्हा त्यांनी उमेदवारी मागितल्याने कोथरूडचे आमदार आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापुढील अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

‘गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराबाबत अनेक वादग्रस्त निर्णय घेण्यात आले आणि त्या निर्णयांविरोधात आपण सनदशीर मार्गाने आवाजही उठवला आहे. प्रत्येक वेळेला न्यायालयात जाऊन दाद मागणे हे लोकशाही पंरपरेला शोभत नाही. पुण्यातील सर्व संस्थांनी मान्य केलेला बालभारती-पौड रस्त्याला काही आमदारांनी विरोध केल्यामुळे तो थांबला आहे. मध्यमवर्गीय पुणेकरांच्या घरावर सहा मीटर रस्ता रुंदीकरण टाकून त्यांचा भविष्यातील विकास बंद करण्यात आला. त्या विरोधात न्यायालयील लढाई लढली आणि त्याला यश आले,’ असे केसकर म्हणाले.‘नांदेड सिटी येथील नागरिकांवर लादण्यात आलेल्या ‘जिझिया’ कराविरोधात सनदशीर मार्गाने लढा दिला आणि नागरिकांना न्याय मिळवून दिला. या निर्णयाचा फायदा जवळपास २० हजार सदनिकाधाकांना झाला. शनिवारवाड्याभोवती शंभर मीटर परिसरात विकास करण्यावर बंदी घालण्यात आली असून, त्याविरोधात न्यायालयीन लढाई सुरू आहे. विधानसभा मतदारसंघाच्या भौगोलिक रचना न पाहता पुणेकरांच्या अनेक प्रश्नांसाठी झटत आहे,’ केसकर यांनी माध्यमांना सांगितले.

‘प्रश्न सोडविणारा लोकप्रतिनिधी हवा’
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधील खड्डे स्वखर्चाने बूजवावे लागतात, याबाबत केसकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ‘कोथरूडच्या वाहतुकीसंदर्भात व्हॉटस्अॅप क्रमांक जाहीर केल्याबद्दल पाटील यांचे त्यांनी अभिनंदनही केले; परंतु नागरिकांना प्रश्न सोडविणारा लोकप्रतिनिधी हवा, असे आपणास वाटते,’ असा खोचक टोला केसकर यांनी लगावला. या पार्श्वभूमीवर विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा असून, कोथरूड किंवा शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांतून उमेदवारी मिळावी, अशी मागणी भाजपकडे केल्याचे केसरकर यांनी सांगितले.

0 6 2 3 5 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *