पुणे: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी राज्य सरकारला नोटीस पाठवणार आहेत. तसे आदेश त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. मुंबई-पुणे, कल्याण-नगरच्या दुरवस्थेवरुन गडकरींनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. तीन महिन्यांत रस्ते दुरुस्त करा. अन्यथा ते रस्ते ताब्यात घेतो, असा अल्टिमेटम गडकरींनी दिला आहे. रस्ते राज्य सरकारच्या ताब्यात आहेत. पण शिव्या मला पडतात, असं गडकरी पुण्यातील एका कार्यक्रमात म्हणाले. जिल्ह्यातील प्रकल्पांच्या भूमिपूजन सोहळा ते बोलत होते.जुना मुंबई-पुणे हायवे आणि कल्याण नगर रस्त्याप्रकरणी नोटीस पाठवण्याचे आदेश नितीन गडकरींनी दिले आहेत. रस्ते दुरुस्त झाले नाहीत तर करार रद्द करा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. ‘महाराष्ट्र सरकारनं आमच्याकडून दोन रस्ते घेतले आहेत. एनएच ४ या रस्त्यावर खूप अपघात होतात. ज्यावेळी पाटणकर साहेब मंत्री होते, तेव्हा करंदीकर साहेब व्यवस्थापकीय संचालक होते. तेव्हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं. त्यावेळी ते माझ्याकडे आले होते. मुंबई-पुणे रस्ता हा नुकसानीत आहे, कर्ज वाढलेलं आहे, असं त्यांनी मला सांगितलं. यातून मार्ग काढण्यासाठी मला पवार साहेबांनी तुमच्याकडे पाठवल्याचं करंदीकरांनी मला सांगितलं,’ असा किस्सा गडकरींनी सांगितलं.’करंदीकर माझ्याकडे आले होते, त्यावेळी मी मंत्री नव्हतो. मी हीच बाब त्यांना सांगितली. ज्यांचं राज्य आहे, त्यांना बघू द्या आता काय करायचं ते असं मी करंदीकरांना म्हटलं. यानंतर शरद पवारांचा मला फोन आला. म्हणाले, नितीन, राज्यातलं सरकार जरी बदललं असलं तरी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हे तुझं अपत्य आहे आणि त्यासाठीचा उपाय तूच काढला पाहिजे, असं पवार साहेबांनी मला सांगितलं,’ असं गडकरी म्हणाले.’त्यानंतर मी जुना मुंबई-पुणे हायवे एमएसआरडीसीला हस्तांतरित केला. त्या करारातील अटी अशी होत्या की या रस्त्यावरील सगळे पूल त्यांनी बांधले पाहिजे. सगळ्या प्रकारे रस्ता चांगला ठेवला पाहिजे. पण आता त्यांनी हा रस्ता ८ हजार कोटी रुपयांत विकून टाकला, पैसे घेतले. पण त्या रस्त्यावर ते कामच करत नाहीत. त्यामुळे तिथले आमदार आता तक्रारी घेऊन माझ्याकडे येतात,’ अशा शब्दांत गडकरींनी राज्य सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.’मी आताच सांगितलंय की महाराष्ट्र सरकारला नोटीस द्या. तीन महिन्यांच्या आत या रस्त्यांची दुरुस्ती झाली पाहिजे. मुंबई-पुणे रोड आणि नगरच्या पुढील दोन टोल महाराष्ट्र सरकार घेतं. पूर्ण रस्ता खराब आहे. म्हणजे रोड आमचा, काम महाराष्ट्र सरकारचं आणि शंभर टक्के शिव्या मी खातो. त्यामुळे सांगितलंय आजच नोटीस पाठवा. हे रस्ते ताबडतोड दुरुस्त करा. नाही तर दोन्ही रस्ते ताब्यात घ्या आणि रस्त्यांची काम करा,’ असं गडकरींनी जाहीर भाषणात म्हटलं.