बेताची परिस्थिती आलीच तर मला बोलवा, मी लगेच येईन; संभाजी राजे असं का म्हणाले?

Khozmaster
3 Min Read

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीचा पुनरुच्चार करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. गेल्या आठवड्यापासून ते पुन्हा जालना येथील आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले असून त्यांची तब्येत खावात चालली आहे. दरम्यान आज उपोषणाचा सातवा दिवस असून राज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मनोज जरांगे पाटील यांची विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी संवाद साधत सरकारला खडे बोलही सुनावलेत. तसेच विरोधकांवरही निशाणा साधला. ‘ सत्ताधाऱ्यांनी बोललंच पाहिजे. तुम्ही सत्तेत आहात. त्याचबरोबर विरोधकांनीही कसं आरक्षण द्या असं नुसतं भाष्य करू नका.’ असं त्यांनी सुनावलं.

मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. ‘ विशेष अधिवेशन घ्या अशी जरांगे यांची मागणी आहे. होऊन जाऊ द्या समोरासमोर. १० टक्के आरक्षण दिलं ते कसं टिकणार आहे, ते दाखवून द्या. शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना न्याय दिला. शाहू महाराजांनी मराठ्यांसह सर्वांना न्याय दिला. त्यामुळे तुम्हीही मराठ्यांना न्याय द्या’ अशी मागणीच संभाजी राजेंनी केली.

उद्या काही झालं तर…

गेल्या आठवड्यापासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असून त्यांनी सलाईन लावू घेण्यासही नकार दिलाय. याच मुद्यावरून बोलताना संभाजी राजे यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.’ आम्ही भरपूर त्रास सहन केला आहे. आता यापुढे नाही चालणार. माझी जरांगेंना साथ आहे. आताही आहे. यापुढेही असणार. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना माझी सूचना आहे की, तुम्ही मेडिकल रिपोर्ट घ्या. परिस्थिती पाहा. हेलिकॉप्टर आहे ना, या तुम्ही इथे. आमच्या डॉक्टरवर विश्वास नाही ना, तर तुमच्या सरकारी यंत्रणांकडून माहिती घ्या. उद्या काही झालं तर सरकार आणि विरोधी पक्ष जबाबदार असेल’ असा इशाराच त्यांनी दिला.

हा शेवटचा लढा
मी इथून निघणार आहे, पण तुम्ही मनोज जरांगे यांना धीर द्या. आश्वासन द्या. तुमच्या हावभावातून हा विश्वास द्या. मागच्यावेळी त्यांनी मी पाणी प्या म्हटलं होतं. त्यांनी माझी विनंती मान्य केली होती. पण आता मी त्यांना म्हणणार नाही. त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. पण तब्येतीला धोका होईल असं त्यांनी काही करू नका’असा सल्ला यांनी दिला. ‘ सरकारवर प्रेशर टाकण्यासाठी किंवा समाजाची बाजू मांडण्यासाठी म्हणा, मी त्यांना पाणी घ्या म्हणणार नाही. अनेकांनी सांगितलं राजे तुम्ही सांगा तुमचा शब्द पाळतील. पण हे सरकार आंदोलन गुंडाळण्यास बसले आहेतच. अनेक लोक बसले आहेत. आंदोलन व्हावे ही अनेकांची इच्छा नव्हती. हा शेवटचा लढा आहे. तुम्ही मला रिपोर्ट द्या. त्यांनी ऐकलं नाही तर मला सांगा. बेताची परिस्थिती झाली तर मला सांगा. मी सांगतो, पाणी घेऊ नका, सलाईन लावू नका. पण एक परिस्थिती येईल की ते घ्यावं लागतं तेव्हा मला सांगा. मी कुठेही असलो तरी अंतरवलीत येईल ‘असे संभाजी राजे म्हणाले. तुम्हाला याचं जराही गांभीर्य नसेल तर सत्तेत राहून तुमचा उपयोग काय?, असा खड़ा सवाल संभाजीराजेंनी सरकारला विचारला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *