“अजित पवार आमचं आयुष्य विस्कळीत करून गेले”, सुप्रिया सुळेंचं विधान; म्हणाल्या…

Khozmaster
2 Min Read

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वर्षभरापूर्वी मोठी फूट झाली. जवळपास ४० आमदारांना घेऊन अजित पवारांनी महायुतीला समर्थन दिलं. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही त्यांनी दावा ठोकला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं. सर्वोच्च न्यायालयाने पक्षचिन्ह आणि पक्षनाव अजित पवार गटाला दिलं. यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. एका कुटुंबातच अशी मोठी राजकीय उलथापालथ झाल्याने या घटनेची राज्यभर चर्चा झाली. यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये त्या बोलत होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्त्व सुप्रिया सुळेंकडे जाणार असल्याने अजित पवारांनी बंड केल्याची चर्चा आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “या मुद्द्यावर मी अजित पवार किंवा त्यांच्या समर्थकांशी खुली चर्चा करायला तयार आहे. पक्षात पक्षाच्या उत्तराधिकारी पदावरून कोणताही वाद नव्हता. पण अजित पवारांनी जे केलं ते चुकीचं होतं.”

मागितलं असतं तर पक्षही दिला असता

“अजित पवारांना नेतृत्त्व द्यायला आम्ही तयार होतो. मी कधीच नेतृत्व मागितलं नाही. ते त्यांनाच मिळणार होतं. त्यांनी मागितलं असतं तर देऊन टाकलं असतं. पक्ष घ्यायची गरज नव्हती, मागितलं असतं तर दिलंही असतं. यात कोणती मोठी डील आहे? आमचं आयुष्य विस्कळीत करून ते गेले. त्यांच्याकडे हा पक्ष ठेवण्याचा पर्याय होता”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बनायला आवडेल का?

गेल्या काही दिवसांपासून राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार अशी चर्चा आहे. यासाठी सुप्रिया सुळेंचंही नाव चर्चेत आहे. या चर्चेबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझं नागरिशास्त्र चांगलं आहे. मी लोकसभेत निवडून गेले आहे. मी लिंगाआधारीत ट्रॅपमध्ये अडकणार नाही. मला मुख्यमंत्री बनायचं नाही. ही माझी पसंती आहे. हे सार्वजनिक आयुष्य आहे. हे एका पदावर अवलंबून नसून सार्वजनिक आयुष्य हा एक प्रवास आहे. राजकारणाबाबत गैरसमज पसरवला जातोय सध्या. पक्ष फोडणे, चिन्ह चोरणे म्हणजे राजकारण नाहीय. देश असा नाही चालत. देश संविधानाने चालतो.”

शरद पवार काय सल्ला देतात?

“शरद पवार कधीच कोणालाच कोणताच सल्ला देत नाहीत. ते त्यांची शांतता एका शस्त्रासारखी वापरतात. मलाही त्यांची ही कला शिकायची आहे”, असंही शरद पवार म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *