सोलापूर : सोलापूर शहरातील स्पर्श फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याचा हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मण जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे. सोलापूर पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे. ही घटना २३ सप्टेंबर रोजी घडली होती. उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री लक्ष्मण जाधव याची प्राणज्योत मालवली. लक्ष्मण जाधव याचा मृत्यू झाल्यानंतर शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा शासकीय रुग्णालयात तैनात केला होता.लक्ष्मण जाधव हा स्पर्श फायनान्स कंपनीत नोकरीस होता. फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या ब्लॅक लिस्टवरील दुचाकी ओढून आणण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी तो गेला होता. दुचाकी वाहन रिकव्हरी करताना लक्ष्मण जाधवला चौघांनी जबर मारहाण केली होती. ही मारहाण लक्ष्मण जाधवला विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली होती. २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता स्पर्श फायनान्स कंपनीकडून ब्लॅक लिस्टवरील दुचाकी घेण्यासाठी लक्ष्मण जाधव, समर्थ गायकवाड, विजय जाधव आणि टीम लीडर आकाश धुमाळ हे नुराणी मस्जिदजवळ गेले होते. त्यानंतर दुचाकी मालकासोबत वाद झाले आणि हाणामारी झाली.दुचाकी मालकासह चौघांनी लक्ष्मण जाधवच्या डोक्यावर आणि छातीवर खोऱ्याने आणि फरशी घालून मारहाण केली होती. गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. विजापूर नाका पोलिसांनी या प्रकरणी अविनाश शंकर मदनावले (वय २४), राजेश शंकर मदनावले (३२, दोघे रा. हुच्चेश्वरनगर, कुमठा नाका), विशाल राजू जाधव (२३, रा. कल्लप्पानगर, निलमनगर रोड, सोलापूर), अमर ज्ञानेश्वर कांबळे (२६, रा. संजयनगर, कुमठा नाका) या चौघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू गायकवाड करत आहेत.