बुलढाणा, 20 नोव्हेंबर : आपल्या सगळ्यांना बोहनी म्हणजे काय हे माहित आहे. दिवसाचा पहिला व्यवहार, पहिला ग्राहक, पहिली विक्री, पहिली आवक, ही विक्री विनासायास व्हावी, विक्रीची किंमत जास्तीत जास्त असावी आणि त्यातून आपणास चांगला फायदा मिळावा अशी शुभसंकल्पना म्हणजे “बोहनी” होय. तशी ही प्रथा व्यापारात वापरली जाते. परंतु आता बोहनीला निवडणुकीतही महत्व प्राप्त झाले आहे. आता थोड्यावेळाने सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. ईव्हीएम मशीनवर आपल्या आवडत्या उमेदवाराला उमेदवाराला पहिलं मत मिळावं, अर्थात आपल्याच उमेदवाराची “बोहनी” व्हावी, अशा उद्देश्याने अनेक मतदान केंद्रावर आतापासूनच कट्टर मतदार पोहोचले आहेत. त्यांना आपल्या मताची बोहनी उमेदवाराच्या पदरात टाकायची आहे. बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी हीच स्थिती आहे. वोटिंग करतांना मी पहिला होतो किंवा पहिली होते, हे सांगताना संबंधित मतदाराच्या चेहऱ्यावर याचा आनंद काही औरच असतो. बुलढाण्यात जरी 13 उमेदवार रिंगणात असले तरी “फाईट” महाविकास आघाडी आणि महायुती दोघांमध्येच प्रामुख्याने आहे. ऍड. जयश्रीताई शेळके यांची मशाल आणि आ. संजय गायकवाड यांचा धनुष्यबाण अमोरासमोर आहेत. दोघांचेही समर्थक “बोहनी” साठी मतदान केंद्राकडे निघाले आहेत. या बोहनीत कोण आघाडी मारेल, हे ईव्हीएम देवीलाच माहित. तसे गुड इव्हिनिंग सिटीकडून आपणांस दिवसभर मतदानबाबत ब्रेकिंग मिळतच राहील.