बुलढाणा : गेल्या पाच वर्षांत राजकारणातील अनिश्चिततेमुळे वातावरण ढवळून निघाले असून, विधानसभा निवडणुकीत आता महायुती पत राखणार की महाविकास आघाडीची सरशी होणार, याकडे लक्ष लागले आहे.
उद्या, शनिवारी मतमोजणी होत असून, त्यातून निकाल स्पष्ट होईल; परंतु, या निकालीची उत्सुकता सध्या लागून आहे. त्यातच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाल्यानंतर प्रथमच विधानसभा निवडणूक होत असल्याने २३ नोव्हेंबर रोजी या दोन्ही पक्षांचा काय ‘निकाल’ लागतो याकडेही लक्ष लागून राहिले आहे. २०१९ मध्ये बुलढाणा जिल्ह्याने
युतीच्या पारड्यात पाच जागा दिल्या होत्या, तर आघाडीच्या पारड्यात दोन जागा टाकल्या होत्या. काँग्रेसच्या दोन विद्यमान आमदारांचा पराभव झाला होता. मलकापूरमधून काय ती एक जागा आल्याने काँग्रेसला दिलासा मिळाला होता. दरम्यान, यंदा मतदानाचा टक्का वाढल्याने तो कोणाच्या पथ्यावर पडतो याविषयी राजकीय तज्ज्ञ काथ्याकूट करत आहे; परंतु सहा ठिकाणी दुरंगी व एका ठिकाणी तिरंगी लढत असल्याने निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस गेल्यावेळी गेलेली त्यांची पत मिळविण्यासाठी झगडत आहे, तर महायुतीमधील पाच जागा कायम ठेवत आणखी एखादी जागा कब्जात घेण्याच्या दृष्टीने महायुती निवडणुकीला सामोरे गेली होती. त्यांचाही यात काय निकाल लागतो हे उद्याच स्पष्ट होईल.शिंदेसेना व उद्धवसेनेची ताकदही दिसणार!
जिल्ह्यात बुलढाणा आणि मेहकर येथे शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना असे द्वंद्व झाले. दोन्हींसाठी विधानसभेची ही पहिलीच निवडणूक. त्यामुळे या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्हीसाठी ही निवडणूक अस्तित्वाची आहे.हे मुद्दे खरेच प्रभावी ठरले का?
■ महिलांचा मतदानाचा टक्का लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत वाढला आहे. त्यांची साथ नेमकी कोणाला मिळाली?, ‘कटेंगे तो बटेंगे’चा प्रचार कितपत प्रभावी ठरला, महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी झालेले मतांचे ध्रुवीकरण खरेच या युती व आघाड्यांना तारणार का?, मराठवाड्यालगतच्या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात ‘ओबीसी फॅक्टर’ खरेच चालला का? जरांगे फॅक्टरचा येथे कितपत प्रभाव होता यासह उमेदवारांचा वैयक्तिक करिष्मा कितपत कामी आला? या सर्व प्रश्नांची उत्तरे ही २३ नोव्हेंबर रोजी दुपारी स्पष्ट होतील. त्यामुळे या निकालाकडे सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.