निवडणुका आल्या की सर्वांत पहिले विदर्भाचा दौरा करून शेतकऱ्यांबद्दल कळवळा व्यक्त करणाऱ्या शरद पवारांच्या ‘तुतारी’ तून
निवडणुकीत फक्त हवाच निघाली. पवारांनी विधानसभा निवडणुकीत दिग्गजांना मैदानात उतरवल्यामुळे विदर्भात तुतारी फुंकल्याशिवाय राहणार नाही, असा अंदाज होता. मात्र त्यांनी रिंगणात उतरवलेला एकही उमेदवार निवडून आला नाही. उलट शरद पवारांच्या पक्षाचा सुपड़ा साफ झाला.
2019 मध्ये एकच राष्ट्रवादी पक्ष होता. त्यावेळी त्यांची ताकद वेगळी होती. मात्र मोठ्या राजकीय घडामोडींनंतर राष्ट्रवादी एकाचे दोन झाले. अजित पवार वेगळे झाले आणि सत्तेत सामील झाले. त्यानंतर खरी राष्ट्रवादी कुणाची असा वादही चालला. न्यायालयात प्रकरण गेले. निवडणुकीपूर्वी अजित पवारांना दिलासा मिळाला आणि घड्याळावरच लढण्याचा मार्ग मोकळा झाला. 2019 नंतर प्रथमच अजित पवार आणि शरद पवार वेगळे लढत होते. दोन पक्ष आणि वेगवेगळे उमेदवार.
त्यामुळे सामन्यात रंगत होती. त्यातल्या त्यात शरद पवारांचं विदर्भावर विशेष प्रेम. त्यामुळे त्यांनी विदर्भातील आपल्या सर्व उमेदवारांसाठी विशेष जोर लावला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढलेल्या विदर्भातील 12 उमेदवारांचा विचार केला तर सगळे मातब्बर नेते आहेत. पण, महायुतीच्या झंझावातापुढे अनेकांना पारंपरिक मतदारसंघातही मात खावी लागली. यात विशेषतः काटोल मतदारसंघाचा उल्लेख करावा लागेल.
याठिकाणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबदबा होता. 2014 चा अपवाद वगळला तर अनिल देशमुख सातत्याने विजयी होत आहेत. पहिल्या टर्ममध्ये तर ते अपक्ष लढले तरी निवडणूक जिंकले होते. यंदा त्यांनी मुलगा सलील देशमुख याला संधी दिली. पण भाजपचे चरणसिंग ठाकूर यांच्याकडून त्यांना पराभव सहन करावा लागला आणि काटोल देशमुखांच्या हातून पुन्हा एकदा गेले.
बंग, शिंगणे यांचाही पराभव ऐन निवडणुकीच्या आधी अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे गेलेले डॉ. राजेंद्र शिंगणे यांचाही पराभव झाला. सिंदखेडराजा मतदारसंघातून त्यांना अजित पवार गटाच्या मनोज कायंदेंनी धूळ चारली. शिंगणे यांच्याकडून पवारांना अपेक्षा होती, मात्र तिथेही अपयश आले.
याशिवाय हिंगणा मतदारसंघातून नव्या चेहऱ्याला संधी देण्याऐवजी शरद पवारांनी ऐंशीच्या घरात असलेल्या रमेश बंग यांना संधी दिली. भाजपच्या समीर मेघेंनी तब्बल 79931 मतांनी बंग यांचा पराभव केला.यासोबतच पूर्व नागपूरमधून दुनेश्वर पेठे, तुमसरमध्ये चरण वाघमारे, मोर्शीचे गिरीश काळे, आर्वीतून मयुरा काळे, तिरोडा येथून रविकांत बोपचे, कारंजा येथून राजेंद्रपाटणी, मूर्तिजापूरचे सम्राट डोंगरदिवे, पुसदमध्ये शहद मैंद, अहेरीत भाग्यश्री आत्राम यांना तुतारीची ललकार देण्यात अपयश आले.
Users Today : 18