पुणे प्रतिनिधी ;-
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारत या प्रकरणाची वास्तविक माहिती त्यांच्याकडेच असल्याचे सूचित केले. नवले ब्रिजवरील अलीकडील भीषण अपघातानंतर सुळे पुण्यातील पाहणीसाठी दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.
सुळे म्हणाल्या, “ही लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पार्थ पवार प्रकरणाबाबत वास्तव माहिती मुख्यमंत्री यांच्याकडेच असेल. त्यामुळे त्यांनाच विचारावे.”
अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर त्यांनी प्रतिक्रिया देताना, “दमानिया अनेक मुद्दे उपस्थित करतात. ईडी ही स्वतंत्र संस्था आहे, परंतु न्यायालयाने केलेल्या निरीक्षणांमुळे काही प्रश्न निर्माण होतात,” असेही त्या म्हणाल्या.
नवले ब्रिजवरील सुरक्षेसंदर्भात गडकरींना विनंती
नवले ब्रिजवरील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक पातळीवर चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सुळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानत अधिक कठोर सुरक्षा धोरणाची मागणी केली.
त्यांनी सांगितले,
“एनजीओ ब्लॅक स्पॉटवर काम करत आहेत. अधिक आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे. केवळ सूचनाफलक नव्हे तर बेल्ट–हेल्मेट सक्तीबाबत कडक धोरण असावे.”
तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मोठ्या प्रमाणावर रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम राबवावा, अशीही त्यांनी विनंती केली.
काँग्रेस व महाविकास आघाडीतील चर्चांवर भाष्य
राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील चर्चांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की,
“काँग्रेसमध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहेत. आम्हाला अजून चर्चा करण्याची संधी मिळालेली नाही. भूतकाळातही काही पक्ष वेगळे लढले होते. महाराष्ट्रात हे नवे नाही.”
समाजातील बदलत्या परिस्थितीबाबत चिंता
महिलांच्या सुरक्षेसंदर्भात बोलताना सुळे यांनी माध्यमातील महिला पत्रकारांनी ‘विशाखा समिती’ संदर्भात सविस्तर अहवाल तयार करून सरकारकडे सादर करावा, असे आवाहन केले.
त्या म्हणाल्या,
“मी शिक्षण घेत असताना परिस्थिती सुरक्षित होती. आज मात्र जंगलातील प्राणी शहरात दिसतात; पर्यावरणीय ताण गंभीर झाला आहे.”
Users Today : 18