घातक शस्त्र बाळगणाऱ्या तरुणास तहसिल पोलिसांकडून अटक
नागपूर, ७ मे २०२५: तहसिल पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घातक शस्त्रासह एक तरुण पकडण्यात आला असून, त्याच्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ६ मे २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ३.४० ते ४.०० वाजण्याच्या दरम्यान, तहसिल पोलिस स्टेशनचे बिट मार्शल, एनजीओच्या अधिकाऱ्यांसह नागपूर रेल्वे स्टेशनच्या मागील गेटजवळ, कॉटन मार्केट आणि ट्रॅफिक चेंबरच्या परिसरात बेघर व भिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करीत असताना, एका संशयित व्यक्तीची हालचाल लक्षात आली.
सदर ईसम निळ्या रंगाचा शर्ट व राखाडी लोअर परिधान करून हातात लोखंडी चाकू घेऊन फिरताना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यास ताब्यात घेतले. आरोपीकडून किंमत अंदाजे ₹२००/- चा लोखंडी चाकू जप्त करण्यात आला.
आरोपीने त्याचे नाव छोलन कृष्णा मालाकन (वय २२ वर्षे, रा. संत्रा मार्केट, रेल्वे स्टेशन जवळ, गणेशपेठ, नागपूर) असे सांगितले. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपी कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगून होता. पुढील तपास तहसिल पोलिस करीत आहेत.
Users Today : 1