कावळा पेठ उड्डाणपूल, अंडरब्रिज व नागपूर शहरातील पुलांच्या समस्या उघड; बसपाचा इशारा
नागपूर | दि. ९ मे – पूर्व व उत्तर नागपूरला जोडणारा कावळा पेठ उड्डाणपूल, अर्धवट अंडरब्रिज आणि शहरातील विविध ठिकाणांवरील अपूर्ण पुलांचे काम या सर्व समस्यांवर बहुजन समाज पार्टीने आज पत्रकार परिषदेत तीव्र संताप व्यक्त केला.
पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश बसपाचे महासचिव पृथ्वीराज शेंडे यांनी सांगितले की, १८० कोटी रुपये खर्चून बांधलेला कावळा पेठ उड्डाणपूल हे अपूर्ण आणि दोषपूर्ण नियोजनाचे उत्तम उदाहरण आहे. डीप्ती सिग्नल ते कळमना दिशेने या पूलाची ‘टी’ स्वरूपात केलेली जोडणी दररोज अपघातांना कारण ठरत असून, याआधी एका तहसीलदाराचा मृत्यू देखील येथे झाला आहे.
शेंडे यांनी सांगितले की, दोन वर्षांपासून अंडरब्रिजचे काम रखडले असून, रेल्वे प्रशासनाकडून ब्रेकडाऊन परवानगी न मिळाल्याने नागरीकांना दररोज ३ किलोमीटर फेरा घालावा लागतो. दोषी अधिकाऱ्यांकडून जबाबदारी निश्चित करून नुकसान भरपाई वसूल करावी, अन्यथा बसपा जनआंदोलन उभारेल असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे संयोजक धनपाल कीरपान उपस्थित होते.
शहरात भंडारा रोड, पारडी, नंदनवन, दिघोरी, आरटीओ, महाल, संविधान चौक, पाचपावली आदी ठिकाणी अपूर्ण पूल, चुकीची लँडिंग आणि दर्जाहीन रस्ते नागरिकांच्या त्रासात भर घालत आहेत.
उड्डाणपूल व सिमेंट रस्त्यांचे अनियोजित जाळे, पावसात घरात पाणी शिरणे, वाहतूक विस्कळीत होणे यामुळे नागपूरकर त्रस्त आहेत. याबाबत उच्च न्यायालयानेही वेळोवेळी शासनाला झापले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केवळ उद्घाटनांमध्ये मग्न असून, नागपूरच्या नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बसपाने केला आहे.
Users Today : 0