डोणगाव :
कौटुंबिक वादाच्या प्रकरणात पोलीस कारवाई होत नसल्याच्या नाराजीतून एका युवकाने थेट डोणगाव पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना १९ मे रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, साजन शहा अब्दुल शहा (वय ३०, रा. डोणगाव) यांचे पत्नीशी कौटुंबिक वाद सुरू आहेत. या प्रकरणी त्यांनी डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याची भावना मनात धरून त्यांनी १९ मे रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या गेटसमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.
घटनास्थळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ युवकाला ताब्यात घेत प्राथमिक आरोग्य केंद्र, डोणगाव येथे उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मेहकर ग्रामीण रुग्णालय येथे रेफर करण्यात आले.
दरम्यान, युवकाने आपल्या सासरच्या मंडळीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, त्यावर कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “वारंवार पोलीस स्टेशनमध्ये जाऊनही उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. त्यामुळे वैतागून विषारी औषध प्राशन केले,” असे युवकाचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाविरुद्ध त्याच्या पत्नीने अकोला येथे कौटुंबिक वादासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. तसेच युवक वारंवार पोलीस स्टेशनमध्ये येऊन पत्नीच्या कुटुंबीयांवर कारवाई करण्यासाठी दबाव टाकत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी युवकाच्या तक्रारीनुसार आवश्यक पत्रव्यवहार आणि प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, त्यानंतरही नाराजी व्यक्त करत युवकाने विषारी औषध प्राशन केल्याचा देखावा केल्याचे सांगण्यात येत असून, कोणतेही विषारी द्रव्य शरीरात गेल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
Users Today : 28