बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्यासह कांदा, बटाटा आणि टोमॅटो लागवड केली होती. त्यामधून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. आणि आता रानडुक्कर, हरीण आणि रोही यांच्या उपद्रवामुळे उन्हाळ्यातील भाजीपाला लागवड करणे देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण झाले आहे.
रात्रंदिवस शेतात पहारा देणेही आता शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे आता उन्हाळी भाजीपाल्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
शेती व्यवसाय कायम अडचणींचा ठरला असुन यामधे खर्च जास्त आणि उत्पादन कमी, असा अनुभव शेतकऱ्यांना येत असल्याने शेतकरी वैतागला आहे. ‘जेव्हा उत्पन्न कमी, तेव्हा भाव जास्त आणि उत्पन्न जास्त तेव्ह, भाव कमी’ असे सुत्र ठरलेले असुन यामधे शेतकरी मार खात आहे. अगोदरच उन्हाळी पिकांना पुरेसे पाणी नसल्याने शेतकरी ठिंबक सिंचन करुन विहिरीत असलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करत आहे. उन्हाळ्यात पालेभाज्याची लागड न करण्यामागे अगोदर केवळ विहिरीत पाणी नसणे हे कारण होते. आता मात्र वन्य प्राणी हे महत्त्वाचे कारण बनले आहे. उन्हाळा असल्याने ह्या वन्य प्राण्यांना जंगलात खाण्यासाठी काहीच नसल्याने त्यांची भटकंती वाढली आहे. अनेक प्राणी तर नागरी वस्तीचा देखील आधार घेत आहेत. पिण्याच्या पाण्याचे आणि खाण्याचे देखील वांधे झाल्याने या प्राण्यांनी आपला मोर्चा जिकडे हिरवे असेल तिकडे वळवला आहे. उन्हाळ्यातील भाजीपाला लागवडीसमोर उभे राहिलेले वन्य प्राण्यांचे संकट शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. शासनाने या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचे आर्थिक नुकसान टाळता येईल आणि ग्राहकांना सहज उपलब्ध होणाऱ्या पालेभाज्यांचा पुरवठा सुरळीत राहील.
संपूर्ण शेताला कंपाऊंड करणे शक्य नसल्याने शेतकरी कमी खर्चात आपल्या पिंकाचे रक्षण कसे करायचे याचा विचार करत आहे. कंपाऊंड करतांना ते जर तकलादू असले तर रोही ते पाडुन शेतात जातात आणि शेतकऱ्यांच्या पिकांना फस्त करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता बाजारात आलेल्या झटका मशीनचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आपल्या शेताला तारांचे कुंपण करुन त्याला झटका मशीनचा करंट सोडला की, यामुळे वन्य प्राणी मरण पावत नाही, परंतु त्याचा जबरदस्त झटका त्यांना बसतो आणि ते शेतात पाऊल ठेवत नाही, असे अनुभवी शेतकरी सांगतात.
तालुक्यातील एकूण उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र २ हजार ५८० हेक्टर असताना, प्रत्यक्षात ५ हजार १३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जी सरासरी क्षेत्राच्या टक्क्यांहून अधिक आहे. कंपाऊंड करुन देखील जंगली प्राण्यांनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. शेतात राखण्यासाठी असतांना देखील माझ्या मुंगसरी शिवारात असलेल्या गट क्रमांक ३६ मधील भेंडी, वांगे, कोथिंबीर आणि चवळी रोह्यांनी खाऊन फस्त केली आहे. मोठ्याप्रमाणावर खर्च करुन आता ऐन विक्रीसाठी तयार होणारा भाजीपाला एका रात्रीत खाऊन फस्त केल्याने मोठे नुकसान झाल्याचे मुंगसरी येथील शेतकरी समाधान शिंदे यांनी सांगितले.
Users Today : 18