उदंड प्रतिसादात गाजले दुसरे महायुद्ध
‘दुसरे महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर’ नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद; सभागृहात खचाखच गर्दी
नागपूर : “युद्ध नव्हे, बुद्ध हवा!” — माणुसकीचा आणि शांतीचा संदेश देणारे ‘दुसरे महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर’ हे नाटक नागपूरच्या साई सभागृहात सादर होताच प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहाने त्याला दाद दिली. बानाई संस्थेच्या निर्मितीमध्ये सादर करण्यात आलेल्या या नाटकाने नागपूरकर रसिकांना विचारप्रवृत्त केले.

प्रख्यात नाटककार प्रभाकर दुपारे लिखित आणि प्रमोद भुसारी दिग्दर्शित या नाटकात दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा वेध घेण्यात आला. नाझी हिटलरने निर्माण केलेल्या साम्राज्यशाही धोरणांना रोखण्यासाठी भारत आणि इंग्रज सरकार यांच्यातील सहकार्याच्या दृष्टिकोनातून नाटकाची मांडणी झाली.
नाटकाच्या सादरीकरणात अँड. विमालसूर्य चिमणकर लिखित पुस्तकाचा आधार घेण्यात आला असून, तेजस्वी संवाद आणि वेगवान कथानक प्रेक्षकांच्या मनाला भिडले. प्रमोद भुसारी यांचे कल्पक दिग्दर्शन, नेपथ्य, तसेच डॉ. सुचित्रा भुसारी यांची वेशभूषा, शिवशंकर माळोदे यांचे प्रकाशयोजन, आणि चारूदत्त जिचकार यांचे संगीत यामुळे सादरीकरण अधिक प्रभावी ठरले.

कलावंतांमध्ये प्रथमेश वलीवकर, अनिल पालकर, मुकुंद वसुले, अतुल भुसारी, मीना देशपांडे, सीमा गोडबोले यांच्यासह सुमारे ४० हून अधिक कलाकार सहभागी झाले होते. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे काही प्रेक्षकांना खाली बसून नाटक पाहावे लागले, हेच त्याच्या यशाचे द्योतक ठरले.
कार्यक्रमाची सुरुवात रणजीत मेश्राम, विलास गजघाटे, बानाईचे अध्यक्ष अरविंद गेडाम आणि सचिव जयवंत इंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी गेडाम यांनी या नाटकाचे महाराष्ट्रभर १०० प्रयोग करण्याचे संकेत दिले.
हे नाटक केवळ ऐतिहासिक दृष्टिकोन मांडणारे नसून, आजच्या काळातील सामंजस्य, मानवता आणि शांती यांचे महत्व अधोरेखित करणारे ठरले.

Users Today : 54