हरवलेली अंगठी… आणि माणुसकीचा तेजस्वी क्षण
नागपूर – आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थाच्या जगात, जर कुणी काही सापडलेली मौल्यवान वस्तू परत केली, तर तो क्षण केवळ प्रामाणिकतेचा नसतो – तो माणुसकीवरचा विश्वास पुन्हा जागा करणारा ठरतो.
अशाच एका प्रसंगाने नागपूरच्या दिघोरी परिसरातील सौ. प्रमिला मोहोड यांनी आपल्या निर्मळ मनाचं दर्शन घडवलं.
भंडारा रोडवरील एसबी टाउनजवळील कटारिया मंगल कार्यालयात 4 मे रोजी एक नामकरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात एका पाहुण्याची सोन्याची, सुमारे ७ ग्रॅम वजनाची अंगठी हरवली. कोणालाही काही समजायच्या आत ती अंगठी सौ. प्रमिला मोहोड यांना सापडली.
तेव्हा त्यांनी तिथेच विचारणा केली, पण कोणीही अंगठीची मागणी केली नाही. त्या अंगठीसोबत त्यांनी आपली जबाबदारी घरी नेली – मनात सतत एक विचार होता, “ही कुणाची तरी मौल्यवान आठवण असावी.”
दोन दिवसांनीही त्या विचारातून बाहेर येता न आल्याने, त्यांनी कार्यक्रमाच्या कुटुंबियांशी संपर्क केला आणि विचारलं – “कुणाची अंगठी हरवली का?” तेव्हा समजलं की, विशाल चरडे नावाच्या चिकणा, हुडकेश्वर येथील गृहस्थाची ती अंगठी होती.
प्रमिला ताईंनी लगेच त्यांना संपर्क करून अंगठी परत दिली. अंगठी मिळाल्यावर विशाल चरडे यांचे डोळे पाणावले – ते केवळ सोनं नव्हतं, त्यांच्यासाठी ती एक भावना होती. त्यांनी प्रमिला ताईंना मनापासून धन्यवाद दिले.
या प्रसंगाने आजही समाजात प्रामाणिकता आणि माणुसकी शिल्लक असल्याचा विश्वास पुन्हा एकदा बळावला.
ही गोष्ट प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय प्रमिला ताईंचे शेजारी श्री. सचिन मानकर यांना जाते, जेवढं कौतुक प्रमिलाताईंचं, तेवढंच कौतुक या गोष्टी शेअर करणाऱ्याचंही.
Users Today : 54