मुंबई : अरबी समुद्रामध्ये कर्नाटक किनारपट्टीजवळ गुरुवारी, २२ मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रभावामुळे राज्यात आज, सोमवारपासून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कोकण, घाट परिसरामध्ये पावसाचा जोर अधिक असू शकतो. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर बुधवारी आणि गुरुवारी ३५ ते ४५ किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहू शकतात. या वाऱ्यांचा वेग ५५ किलोमीटर प्रतितास एवढा होऊ शकतो.
राज्यात १९ ते २५ मे या कालावधीत पावसाचा जोर वाढून स्थानिक पातळीवर सखल भागामध्ये पाणी साचणे, अचानक पूरस्थिती निर्माण होणे, कमकुवत झाडे पडणे, झाडांच्या फांद्या तुटून पडणे, रस्ते, विमान वाहतूक, बोट वाहतूक, रेल्वे यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कमकुवत बांधकाम, झाडे येथे पावसामध्ये आश्रय घेऊ नये, अशी सूचना केली आहे.मेघगर्जना होताना उंच झाडाखाली उभे राहणे टाळावे, मोकळ्या मैदानात थांबू नये, असेही सांगितले आहे. दक्षिण कोकण, गोवा या किनाऱ्यांवर १९ आणि २० मे रोजी, तर उत्तर किनाऱ्याजवळ २१ आणि २२ मे रोजी वाऱ्यांचा वेग वाढू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळामध्ये मच्छिमारांनी समुद्राच्या संबंधित क्षेत्रात जाऊ नये, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.अरबी समुद्रातील चक्रीय वात स्थितीच्या प्रभावाखाली निर्माण होणारे कमी दाबाचे क्षेत्र २२ मे रोजी तयार होऊन त्याचा प्रवास उत्तरेकडे होणार आहे. उत्तरेकडे प्रवास करताना ही प्रणाली अधिक सक्षम होण्याची शक्यता आहे. सोमवारसाठी नाशिक जिल्हा, नाशिकचा घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुण्याचा घाट परिसर, कोल्हापूरचा घाट परिसर, साताऱ्याचा घाट परिसर येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्याच्या घाट परिसरामध्ये मंगळवारीही ऑरेंज अलर्ट कायम आहे, तर कोल्हापूरचा घाट परिसर येथे गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणात मुसळधारांची शक्यता –
कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंगळवार ते गुरुवार या कालावधीत, रत्नागिरी जिल्ह्याला बुधवारी, गुरुवारी आणि रायगड जिल्ह्याला गुरुवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, मेघगर्जना आणि ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणामध्ये गुरुवारपर्यंत यलो अलर्ट असून मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. मात्र, ही प्रणाली कोणत्या दिशेने प्रवास करते, या प्रणालीला होणारा बाष्पपुरवठा यावर पावसाची माहिती प्रादेशिक हवामान विभागाकडून अद्ययावत करण्यात येईल.
Users Today : 18