अभिनंदन महाराष्ट्र! परकीय गुंतवणुकीत ऐतिहासिक झेप
देशातील एकूण गुंतवणुकीच्या 40% वाटा महाराष्ट्राचा; गेल्या वर्षीपेक्षा 32% वाढ
मुंबई, 29 मे 2025 :
महाराष्ट्राने पुन्हा एकदा आर्थिक क्षेत्रात आपली दखलपात्र कामगिरी सिद्ध करत देशातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये महाराष्ट्रात 1,64,875 कोटी रुपये इतकी विक्रमी गुंतवणूक झाली असून, ही देशात आलेल्या एकूण 4,21,929 कोटी रुपयांपैकी 40% आहे. ही आकडेवारी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीतील (जानेवारी ते मार्च 2025) नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुंतवणुकीत 32% वाढ झाली आहे. केवळ शेवटच्या तिमाहीतच महाराष्ट्रात 25,441 कोटी रुपये इतकी गुंतवणूक आली आहे. हे आर्थिक वर्ष राज्यासाठी गेल्या दहा वर्षांतील सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. विशेष म्हणजे, राज्याने हे यश फक्त पहिल्या 9 महिन्यांतच गाठले होते.
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे मन:पूर्वक अभिनंदन करत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य मंत्रिमंडळाच्या नेतृत्वाचेही कौतुक केले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, “ही आर्थिक घौडदौड अशाच प्रकारे पुढे सुरू राहील.”
मागील आर्थिक वर्षांतील परकीय गुंतवणुकीचा आलेख:
2015-16 : ₹61,482 कोटी
2016-17 : ₹1,31,980 कोटी
2017-18 : ₹86,244 कोटी
2018-19 : ₹57,139 कोटी
एप्रिल-ऑक्टोबर 2019 : ₹25,316 कोटी
2020-21 : ₹1,19,734 कोटी
2021-22 : ₹1,14,964 कोटी
2022-23 : ₹1,18,422 कोटी
2023-24 : ₹1,25,101 कोटी
2024-25 : ₹1,64,875 कोटी ✅ (रिकॉर्ड ब्रेक)
राज्याच्या विकासासाठी ही गुंतवणूक महत्त्वपूर्ण ठरणार असून रोजगाराच्या नव्या संधी, उद्योगवाढ आणि पायाभूत सुविधा विस्तार याला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
Users Today : 3