अतुल वांदिले यांच्या पाठपुराव्याला यश : वणा नदीवरील लोखंडी पूल स्थानांतरासाठी ना. नितीन गडकरींचा त्वरित सकारात्मक प्रतिसाद
प्रतिनिधी : प्रविण जगताप वर्धा जिल्हा
हिंगणघाट – येथील राष्ट्रीय महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालयाजवळ असलेल्या लोखंडी पुलाला वणा नदीवर स्थानांतरीत करण्याच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस (शरद पवार गट) श्री. अतुल वांदिले यांनी आज दि. 7 जुलै रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली आणि संबंधित मागणीचे निवेदन सादर केले.
या भेटीदरम्यान शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष व मनसेचे राज्य चिटणीस हेमंत गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील राऊत, तसेच सामाजिक कार्यकर्ते दशरथ ठाकरे हे उपस्थित होते.
या निवेदनाची तत्काळ दखल घेत, ना. गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधला आणि पुलाची तांत्रिक पाहणी करून योग्यतेनुसार तो वणा नदीवर स्थानांतरित करण्याचे स्पष्ट आदेश दिले. पूल योग्य स्थितीत असल्यास त्वरित स्थानांतरणासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
त्याचप्रमाणे, नांदगाव येथील उड्डाण पुलावर दोन वेळा पडलेल्या भगदाडांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त करत, दोषी कंत्राटदारावर कारवाई करत त्याला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
पूल स्थानांतराचे महत्त्व
वणा नदीवर गाडगेबाबा समाधी व 51 फूट उंच विठ्ठल मूर्ती असल्याने भाविकांची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी पूल उभारल्यास भाविकांना प्रवासात सुलभता लाभेल. तसेच, जर वणा नदीवर हे स्थानांतरण शक्य नसेल, तर छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डजवळ पूल उभारल्यास महामार्गावरील अपघात टाळण्यात मदत होईल, असेही श्री. वांदिले यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले होते.
हिंगणघाटकरांच्या भावनांचा सन्मान
“ना. नितीनजी गडकरी यांनी माझ्या मागणीची तात्काळ दखल घेऊन स्थानिक जनतेच्या भावना आणि गरजांचा सन्मान केला आहे. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे हिंगणघाटकरांच्या दीर्घकाळच्या मागणीला चालना मिळाली आहे,” असे श्री. अतुल वांदिले यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे हिंगणघाट शहराला ना. गडकरी यांची विशेष दाद मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
Users Today : 18