✊ नामांतर शहीद दिनी हौतात्म्यांना अभिवादन, कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ✍️
“हौतात्म्यांचे रक्त आजही न्यायाच्या मशालीला पेटवतं आहे” – जयदीपभाई कवाडे
नागपूर : 1978 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी झालेल्या ऐतिहासिक लढ्यात शहीद झालेल्या वीरांना ‘पीपल्स रिपब्लिकन पार्टी’ (पीरिपा) तर्फे सोमवारी इंदोरा, दहा नंबर पुलिया येथील नामांतर शहीद स्मारकावर अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीपभाई कवाडे म्हणाले, “1978 साली नागपूरच्या रस्त्यांवर सांडलेले रक्त आजही केवळ इतिहास नाही, तर सामाजिक न्यायासाठीची मशाल आहे. या हौतात्म्यांच्या रक्ताने फक्त रस्ते नव्हे, तर लाखो मनं जागवली आहेत.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी लाँग मार्चचे प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना आदरांजली वाहिली. यावेळी सौ. प्रतिमा जयदीप कवाडे, कपिल लिंगायत, कैलास बोंबले, डॅनी शामकुंवर, सुनील कांबळे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. ‘जय भीम’, ‘शहीदांचा विजय असो’, ‘नामांतर आंदोलन जिंदाबाद’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
जयदीपभाई कवाडे यांनी पुढे सांगितले की, 4 ऑगस्ट 1978 रोजी नागपूरमध्ये झालेल्या शांततामोर्चावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच तरुणांनी हौतात्म्य स्वीकारले – रतन मेंढे, किशोर माकले, अब्दुल सत्तार, शब्बीर हुसेन, आणि अविनाश डोंगरे. त्यांचे बलिदान आजही सामाजिक न्यायाच्या संघर्षाची प्रेरणा आहे.
🎓 कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर: नवचैतन्य व युक्तिवादाचा संगम
त्याच दिवशी रविभवन येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे अध्यक्षस्थानी होते, तर उद्घाटन जयदीपभाई कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
शिबिरात कार्यकर्त्यांना निवडणूक रणनीती, प्रचाराचे नियोजन, जनतेशी संवाद, व सामाजिक मुद्द्यांवरील भुमिका यावर सखोल मार्गदर्शन देण्यात आले. शहर व ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकारी, युवक आघाडी, रमाई महिला ब्रिगेड, तसेच विविध आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
प्रशिक्षण शिबिराचा उद्देश कार्यकर्त्यांना अधिक सक्षम, सजग व सक्रिय करणे हा होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभावी प्रचारयंत्रणा, संघटनात्मक मजबुती व सामाजिक प्रभाव यावर भर देण्यात आला.
Users Today : 54