🔹 कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करु नये – तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनची ऊर्जामंत्र्याकडे मागणी
नागपूर:
महाराष्ट्रातील विविध वीज कंपन्यांमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात येऊ नये, अशी जोरदार मागणी तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनने राज्याचे ऊर्जामंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ही माहिती असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
कंत्राटी कामगारांनी महावितरण आणि महापारेषणसारख्या कंपन्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महत्वपूर्ण भूमिका बजावली असून, त्यांनी आपल्या आयुष्यातील १० ते १५ वर्षे समर्पणाने सेवा दिली आहे. सध्या त्यांचे वय ४० ते ५० वर्षांदरम्यान असून, त्यांचे कुटुंब त्यांच्या रोजगारावर अवलंबून आहे.
नुकतीच महावितरण व महापारेषणमध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत सहाय्यक पदांची भरती करण्यात आली आहे. यामध्ये नवनियुक्त कर्मचाऱ्यांना पदस्थापना दिल्यानंतर सुमारे ८,००० कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर संघटनेने राज्य सरकारकडे मागणी केली आहे की, या कामगारांना तिन्ही वीज कंपन्यांमध्ये शाश्वत रोजगाराची हमी द्यावी. त्यांच्यासाठी “विशेष पद भरती मोहिम” राबवण्यात यावी व नवनियुक्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमुळे कोणताही कंत्राटी कामगार कामावरून कमी होऊ नये.
ही मागणी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने, कार्याध्यक्ष विक्की कावळे, सरचिटणीस प्रदीप पाटील, नितिन चव्हाण, अनिल चव्हाण, शेख राहिल, शंकर जारकड, अतुल पाटील, प्रताप खंडारे, धिरज घायवट, अनिवेश देशमुख, कुणाल जिचकार, मयुर कोठे, निलेश चक्रपाणी, निशांत काळसर्पे, विक्की पाचघरे, मंगेश चिमोटे, विलास कुमेरिया, जयपाल हटवार आदींनी केली आहे.
Users Today : 8