सैनिकांना नागपूरकरांकडून राख्या — देशाच्या रक्षकांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा!
नागपूर | ६ ऑगस्ट २०२५ :
गेल्या १९ वर्षांपासून सुरू असलेल्या एक आगळ्या-वेगळ्या उपक्रमात यंदाही नागपूरकरांनी सीमेवर तैनात सैनिकांना राख्या पाठवून त्यांच्या दीर्घायुष्याच्या आणि सुरक्षिततेच्या शुभेच्छा दिल्या. देशभक्ती आणि बांधिलकीची जाणीव व्यक्त करणाऱ्या या उपक्रमासाठी नागपूरचे संयोजक डॉ. निखिल भुते यांनी पुढाकार घेतला.
भारतीय सेनेच्या लडाखमधील कारगिल पोस्टवरील सैनिकांसाठी खास नागपूरकरांनी स्वतः तयार केलेल्या राख्या नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते पाठवण्यात आल्या. या उपक्रमात नागपूर महाराजा ट्रस्टचे श्रीमंत राजे मुधोजी भोसले, श्रीगुरूदेव युवामंचाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक, तायवाडे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य विक्रांत चिलाटे, तसेच मिसेस युनिव्हर्स प्रविणा दाढे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सैनिकांच्या समर्पणाचे आणि त्यागाचे कौतुक करत, प्रत्येक नागरीकाने देशाच्या रक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे असे मत व्यक्त केले. डॉ. इटनकर यांना राखी बांधून मिसेस युनिव्हर्स प्रविणा दाढे, मोनाली कोहले, रिदा शेख, अंजली भांडेकर, आणि खुशी यादव यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. निखिल भुते, प्रास्ताविक प्रा. विक्रांत चिलाटे तर आभार प्रदर्शन प्रा. कमलेश माचेवार यांनी केले.
या यशस्वी उपक्रमासाठी तायवाडे फार्मसी कॉलेज आणि तायवाडे इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा मधील विद्यार्थी, शिक्षक आणि स्वयंसेवकांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. या विद्यार्थ्यांमध्ये रिदा शेख, सुहानी राऊत, खुशी यादव, मोहिनी त्रिवेदी, वैशाली भुरे, आदित्य देशमुख, अर्णव बनसोड, सुमेध पाटील, जीवन जावाले, निहार कवरे यांचा विशेष सहभाग होता.
हा उपक्रम केवळ राखी पाठवण्यापुरता मर्यादित नसून, तो देशाच्या रक्षकांप्रती असलेल्या आपुलकीचा आणि एकतेचा प्रतीक आहे. नागपूरकरांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Users Today : 4