बुलढाणा | प्रतिनिधी
५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता बुलढाणा वळणरस्त्यावर एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला. पोलीस असल्याचा अधिकार वापरून, कागदपत्र तपासणीच्या नावाखाली वाहनचालकाकडून चक्क खंडणी उकळल्याचा आरोप बुलढाणा पोलीस दलातील विविध शाखांमधील पाच पोलीस अंमलदारांवर करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील:
कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील गांधीनगर चल्लेकेरे येथील ताज अब्दुल रहेमान रहमतुल्ला हे आपल्या सहकारी जबेर अहेमद यांच्यासोबत तवेरा गाडी (क्र. केए-११-ए-२८६२) ने चिखलीहून मलकापूरकडे जात होते.
बुलढाणा बायपास रोडवर पोलीस अंमलदार अभय टेकाळे व भंडारी यांनी त्यांची गाडी अडवली व कोणतीही अधिकृत कारवाई न करण्याच्या मोबदल्यात जवळच्याच चहा दुकानदाराच्या पेटीएमवर १५०० रुपये मागून घेतले.यानंतर काही वेळात पांढऱ्या रंगाच्या ‘किया’ गाडीमधून महामार्ग सुरक्षा पोलीस विभागाचे अंमलदार काळोसे, आंधळे व तिडके यांनी पुन्हा त्यांची गाडी अडवली. गाडीची तपासणी करताना त्यांना एक एअर रायफल आढळली. यावरून त्यांनी शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तब्बल २ लाख रुपयांची खंडणी मागितली. ताज अब्दुल यांनी ही रक्कम देण्यास असमर्थता दर्शवताच, ५० हजारांची मागणी करण्यात आली.
पळून जाण्याचा प्रयत्न, अपघात आणि पुन्हा धमकी:
सदर पोलीस खरे की तोतये, या संशयाने ताज यांनी गाडी घेऊन देऊळगाव राजाच्या दिशेने पळ काढली. मात्र एका अंमलदाराने गाडी थांबवून स्वतः उतरून निघून गेला. गोंधळलेल्या ताज यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. गाडी पलटी झाल्यानंतरही तीनही पोलीस घटनास्थळी परतले आणि पुन्हा पैशाची मागणी सुरूच ठेवली. दरम्यान, देऊळगाव राजा पोलीस येत असल्याचे लक्षात येताच, आरोपींनी ताज यांना कोणालाही काही न सांगण्याची धमकी दिली आणि घटनास्थळावरून फरार झाले.
गुन्हा दाखल व पुढील तपास:
ताज अब्दुल यांनी चिखली पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पोलीस अंमलदारांवर भारतीय न्याय संहितेचे कलम ३०८(२), ३०८(३), ३५१(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात कारवाई झाली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर करत आहेत.ही घटना उघडकीस आल्यामुळे बुलढाणा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी आता नागरिकांमधून होत आहे.
Users Today : 10