भ्रष्टाचार हटाव, नागपूर बचाव : क्रांती दिनी बाबा शेळके यांचा गांधीगिरीतून अन्नत्याग सत्याग्रह
नागपूर, ९ ऑगस्ट २०२५:
“9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त, गांधीगिरीच्या मार्गावर चालत माजी नगरसेवक बाबा शेळके यांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला आहे.”
उदासीन प्रशासनाला जागे करण्यासाठी, क्रांती दिनाच्या पर्वावर गांधीगिरीच्या मार्गावर बाबा शेळके यांचे अन्नत्याग सत्याग्रह सुरू आहे.
माजी नगरसेवक आणि जागृत ज्येष्ठ नागरिक कमिटीचे अध्यक्ष बाबा शेळके यांनी गांधीबाग झोन क्र. ६, राहतेकर वाडी, महाल, नागपूर येथील मनपा कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला आहे.
नागपूरकर जनतेला उद्देशून बाबा शेळके म्हणाले, “आपल्या शहरात मागील चार वर्षांपासून एकछत्री प्रशासनाचे राज्य सुरू आहे. जनसामान्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. प्रशासन समस्या वाढविण्याचेच काम करत आहे. भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक नसल्यामुळे अधिकारी हुकूमशाही पद्धतीने कारभार करत आहेत.”
अनेक वेळा निवेदने दिली गेली, परंतु प्रशासनाने न्याय दिला नाही. म्हणूनच गांधीविचारांचा आधार घेत, त्यांनी सत्याग्रही मार्गाने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
या आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागपूर शहरात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, नागरी सुविधांमधील भ्रष्टाचार, आणि प्रशासनातील निष्क्रियतेविरोधात आवाज उठवणे.
“जय बापू, जय संविधान, इन्कलाब जिंदाबाद!” अशा घोषणांनी परिसर भारून गेला आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ गांधीवादी श्रीमती लीलाताई चितळे दुपारी १ वाजता उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समाजसेवक सुनील चोखारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रमुख मागण्या:
-
नागपूर शहरात होत असलेले अनधिकृत बांधकाम थांबवावे.
-
आदेश असूनही अधिकाऱ्यांच्या बदल्या न होण्याचे कारण स्पष्ट करावे.
-
शहरातील स्वच्छता आणि सॅनिटायझेशनची व्यवस्था सुधारावी.
-
महापालिकेच्या बांधकामांचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे – याची चौकशी व्हावी.
-
मनपाच्या दवाखान्यांमध्ये नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात.
या आंदोलनाला अरुण केदार, सुनिल चोखारे, प्रकाश खंडागडे, बाबासाहेब गायकवाड, दत्तात्रय जगताप, सुरेंद्र बुराडे, बाबा मुस्तफा, विनोद उल्लीपवार, कृष्णा पाल्लेंवार यांसारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे.
नागपूरकरांनी या लोकहितार्थ लढ्यात सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Users Today : 51
जय विदर्भ