राज ठाकरेंचा संतापजनक इशारा : “दुबार-तिबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढा!”
सत्याच्या मोर्चात राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल
मुंबई, विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत आज महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांनी निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधील घोळाविरोधात “सत्याचा मोर्चा” काढला. हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागाने हा मोर्चा अतिशय भव्य स्वरूपात पार पडला. या मोर्चात विरोधकांची एकजूट स्पष्टपणे दिसून आली.
या मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार, तसेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे प्रमुख नेते उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने निवडणूक आयोगावर टीका करत “मतदार याद्या स्वच्छ करा, मग निवडणुका घ्या” अशी मागणी केली.
राज ठाकरेंचा घणाघाती हल्लाबोल
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोशपूर्ण भाषण करत सत्ताधारी महायुती आणि निवडणूक आयोगावर जोरदार प्रहार केला.
“मतदारयाद्यांमधला घोळ स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका,” असा इशारा त्यांनी दिला.
ते म्हणाले, “हे काय निवडणुका म्हणायच्या का? एक आमदार स्वतः सांगतो की मी २० हजार मतं बाहेरून आतमध्ये आणली. म्हणजे सत्तेचा माज बघा! यांची हिंमत बघा!”
राज ठाकरेंनी पुढे उघड केले की, मतदारयाद्यांमध्ये विचित्र माहिती नोंदवली गेली आहे — “मुलीचं वय १४, वडिलांचं वय १४३ दाखवलं आहे! कुणाचं नाव आयुक्तांच्या बंगल्यावर तर कुणाचं सुलभ शौचालयात नोंदवलं आहे. कोणी रस्त्यावर बसलेला दिसला की त्यालाच मतदार बनवतात का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
“दुबार मतदार दिसले तर तिथेच फाडून काढा” — राज ठाकरे
राज ठाकरेंनी आपल्या भाषणात पुढे इशारा दिला की, “दुबार-तिबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढा! बडवून पोलिसांच्या हवाली करा. नाहीतर हा प्रकार थांबणार नाही.”
ते म्हणाले, “जो मतदार प्रामाणिकपणे रांगेत उभा राहून मतदान करतो, त्याच्या मताची किंमत काय राहिली आहे? हे सर्व जनतेपर्यंत पोहोचवा आणि मतदारयाद्यांमधील घोळावर जनजागृती करा.”
राज ठाकरेंनी यावेळी मतदारयाद्यांतील घोळाचे पुरावे असलेली कागदपत्रांची मोठी गठ्ठी सभेत दाखवत, “आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. हजारो मतदारांनी दुबार मतदान केल्याचे आमच्या यादीत स्पष्ट दिसते,” असा दावा केला.
“आजचा मोर्चा ही फक्त निदर्शने नाहीत, हा राग आणि ताकद दाखवण्याचा क्षण आहे,” असे राज ठाकरे म्हणाले.
Users Today : 20