पुन्हा शिवाजीराजे भोसले’चे शोज हाऊसफुल; दोन दिवसांत तब्बल ५३ लाखांची कमाई!

Khozmaster
2 Min Read

मुंबई (प्रतिनिधी):
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक आशयावर आधारित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाने प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे महाराष्ट्रभर शोज हाऊसफुल होत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, न्यायप्रियता आणि समाजाभिमुख विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी छत्रपतींची भूमिका साकारली असून त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षक आणि समीक्षकांकडून एकमुखानं कौतुक होत आहे.

दोन दिवसांची दमदार कमाई:
सॅकनिल्क’ या बॉक्स ऑफिस कलेक्शन ट्रॅकर वेबसाइटनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी १९ लाख, तर दुसऱ्या दिवशी ३४ लाख रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे दोन दिवसांत एकूण ५३ लाख रुपयांचा गल्ला जमवण्यात या चित्रपटाने यश मिळवलं आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज ठाकरे यांचं आवाहन, प्रेक्षकांचा ओघ वाढतोय:
चित्रपटाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील सकारात्मक प्रतिक्रिया देत “हा प्रत्येक मराठी माणसाने पाहावा” असं आवाहन केल्यानंतर प्रेक्षकांचा ओघ वाढल्याचं चित्र दिसत आहे. राज्यातील अनेक शहरांतील थिएटर्समध्ये सलग हाऊसफुल शोज लागत असून, माऊथ पब्लिसिटीमुळे चित्रपटाचा विस्तार आणखी होण्याची शक्यता आहे.

कथा आणि कलाकारसंघ:
छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळात अवतरले तर ते शेतकऱ्यांच्या वेदना आणि अन्यायाविरुद्ध कशी भूमिका घेतील?” — या रोचक कल्पनेवर आधारित आहे ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’.
चित्रपटात विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, सयाजी शिंदे, नित्यश्री, रोहित माने यांच्यासह राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचं असून संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केलं आहे.

महेश मांजरेकर म्हणाले —

“शेतकरी आत्महत्यांचा विषय मला अनेक वर्षांपासून अस्वस्थ करत होता. या चित्रपटातून आम्ही समाजासमोर तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याच्या परिस्थितीत महाराज असते तर ते नक्कीच संतप्त झाले असते. हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाचा आहे,” अशी भावना मांजरेकरांनी व्यक्त केली.

0 8 8 0 6 3
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *