मुंबई विशेष प्रतिनिधी ;-
मुंबईत थंडीची सुरुवात होताच हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत असून शहराची हवा सलग ‘मध्यम’ ते ‘खराब’ श्रेणीत नोंदली जात आहे. पहाटे शहरभर पसरलेले दाट धुकं आणि धुरकट वातावरणामुळे दृश्यमानता कमी होत आहे. यामुळे ही ‘गुलाबी थंडी’ नसून ‘प्रदूषणाची धुके’ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
AQI धोकादायक पातळीवर
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) माहितीनुसार मुंबईचा एकूण AQI 106 ते 160 दरम्यान नोंदवला गेला आहे, जो मध्यम (Moderate) श्रेणीत मोडतो. शनिवारी हा निर्देशांक 104 होता, तर एका खाजगी एजन्सीनुसार AQI 142 नोंदवला गेला आणि मुंबई जगातील नववे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरली.
ऑक्टोबरमध्ये पावसामुळे सुधारलेली हवा आता पुन्हा प्रदूषणाच्या फेऱ्यात अडकली आहे. थंडीची चाहूल लागताच वाऱ्याचा वेग मंदावला असून त्यामुळे हवा स्थिर झाली व प्रदूषक घटक खाली थरात जमा होत आहेत. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत अनेक भाग ‘मध्यम’वरून थेट ‘खराब’ श्रेणीत जाण्याची शक्यता आहे.
आरोग्यावर गंभीर परिणाम
वायू प्रदूषणामुळे खालील समस्या प्रकर्षाने जाणवू शकतात:
-
श्वसनाचे त्रास: दमा वाढणे, खोकला, श्वास घेण्यास त्रास, फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे
-
हृदयविकाराचे धोके: रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढणे
-
ऍलर्जी आणि डोळ्यांची जळजळ: डोळे लाल होणे, पाणी येणे, शिंका येणे
-
अतिधोका गट: लहान मुले, वृद्ध, दमा आणि हृदयविकार असलेले रुग्ण
कोणत्या खबरदारी घ्याल?
-
N95/KN95 मास्क वापरा
-
पहाटे आणि संध्याकाळच्या वेळेत बाहेर जाणे टाळा, या काळात AQI जास्त असतो
-
घरातील हवा स्वच्छ ठेवा; खिडक्या कमी उघडाव्या, शक्य असल्यास एअर प्युरिफायर वापरा
-
पुरेसे पाणी प्या, शरीरातील दाह कमी करण्यास मदत होते
-
जड व्यायाम टाळा, विशेषतः खुल्या हवेत
-
लहान मुले आणि वृद्धांनी बाहेरील हालचाल मर्यादित ठेवावी
मुंबईत वाढत्या प्रदूषणाचा धोका लक्षात घेता तज्ज्ञांनी पुढील काही दिवसांमध्ये स्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशारा दिला आहे. शहरात ‘थंडी’पेक्षा ‘विषारी हवा’ अधिक धोकादायक ठरत आहे आणि नागरिकांनी आरोग्य रक्षणासाठी काळजी घेणे अत्यावश्यक बनले आहे.
Users Today : 18