विशेष प्रतिनिधी ;-
मराठवाड्यातील दौऱ्यावर असलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर पहिली मोठी आणि थेट प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी कर्जमाफी, सरकारची भूमिका आणि जमीन व्यवहारातील कथित गैरप्रकारांवर त्यांनी जोरदार टीका केली.
कर्जमाफी आणि सरकारवर टीका
दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, केवळ विरोधासाठी विरोध करणे हा उद्देश नाही.
“शेतकऱ्यांचे आयुष्यच वाहून गेले आहे. जमीन नाहीशी झाली, कर्जाचं ओझं वाढलं. यांना सर्व माहिती आहे की कुठून काय जातंय. जर आज आपण शेतकऱ्यांना आधार दिला नाही तर पुढे काय देणार?” असे त्यांनी सांगितले.
पार्थ पवार जमीन घोटाळ्यावर भाष्य
अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या पार्थ पवार जमीन प्रकरणावर ठाकरे म्हणाले –
“अजित पवारांच्या पोराचे प्रकरण काढलंय अंबादासने. हे सर्व चक्र अतिशय घाणेरडे आहे. आधी कमी भावाने जमीन घेणार आणि काही दिवसांनी तिची किंमत सोन्यापेक्षा जास्त होणार. महामार्गालगतच्या जमिनी कोण खरेदी करतंय, शक्तीपीठ महामार्गाजवळ दलालांचीच जमीन आहे.”
त्यांनी सरकारवर टोमणा मारत म्हटले की, न्याय मागितला की सरकारचे प्रमुख टोमणे मारतात. “हे मुख्यमंत्री बोलतात? असा प्रश्न पडतो,” असेही त्यांनी टीका केली.
पक्ष आणि चिन्ह गमावल्याचा उल्लेख
उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष आणि चिन्ह गमावल्याची खंत व्यक्त करताना म्हटले –
“माझा पक्ष, चिन्ह चोरले. माझ्या वडिलांनाही चोरले. पण माझी माणसं जाग्यावर आहेत, ती कुणी चोरू शकत नाही.”
शिंदे–फडणवीस सरकारवर थेट प्रहार
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना “नगरभकास मंत्री” म्हणत टीका केली.
“मुख्यमंत्री महाराष्ट्रात नाहीत. शेतकरी टाहो फोडतायत आणि CM बिहारमध्ये. तिथे जाऊन म्हणतात ‘ये अंदर की बात है…’ इथे बहिणींना दीड हजार देऊन मतं घेतली आणि विसरले. मग बिहारमध्ये 10 हजार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यांनी पुढे राज्य सरकारने कर्जमुक्तीचा मार्ग स्पष्ट करावा, बँकांच्या फायद्यापेक्षा शेतकऱ्यांना कसा लाभ होईल याची उत्तरे द्यावीत, अशी मागणी केली.
निष्कर्ष
पार्थ पवार प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी घेतलेली उघड भूमिका आणि सरकारवर केलेले तीव्र भाष्य यामुळे आगामी राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
Users Today : 22