पातूर प्रतिनिधी :-
चतारी परिसरातील शेतकरी जयप्रकाश पांडुरंग डिवरे (सर्वे नं. ६०/१) यांच्या शेतातील विहीर दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे खचली असतानाही, आजतागायत पंचनामा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
डिवरे यांनी वारंवार तलाठी कार्यालयात जाऊन विनंती करूनही पंचनामा करण्यास टाळाटाळ होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. शासनाकडून नुकसानभरपाई मिळविण्यासाठी पंचनामा अत्यावश्यक असतानाही संबंधित तलाठींकडून उदासीनता दाखविली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी आधीच कर्जबाजारीपणाशी झुंज देत असताना, अशा प्रकारच्या प्रशासनिक निष्क्रियतेमुळे त्यांचे हाल अधिक वाढले आहेत. त्यामुळे तहसीलदारांनी तत्काळ दखल घेऊन पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
चतारी-खेट्री या दोन्ही गावांसाठी तलाठी कार्यालय चतारी येथे असून, कार्यालयाला अनेकदा कुलूप असते. त्यामुळे विविध कामांसाठी येणारे शेतकरी ताटकळत परत जातात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सदर गावाचे तलाठी धम्मपाल नकाशे यांचा अपघात झाल्याने ते रजेवर आहेत. मात्र त्यांच्या जागी अतिरिक्त तलाठी कोण आहे याबाबतही ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. गावात अधिकारी फिरकत नसल्याने शेतकऱ्यांची कामे प्रलंबित राहिली असून, या परिस्थितीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
Users Today : 18